Drug-free Maharashtra : “नशामुक्त महाराष्ट्रासाठी अमली पदार्थांच्या समूळ उच्चाटनावर भर” – मुख्यमंत्री फडणवीस
राज्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने नशामुक्त महाराष्ट्र - लक्ष्यवेध १.० अभियानाचा शुभारंभ वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

Drug-free Maharashtra – तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने आणि होल ऑफ गव्हर्नमेंट दृष्टिकोनातून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.
नशामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या काळात अमली पदार्थांच्या परिसंस्थेचे समूळ उच्चाटन करण्यावर भर देण्याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. अमली पदार्थांची वाढती परिसंस्था येत्या काळात समूळ नष्ट करीत देशाचे आणि पर्यायाने समाजाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने नशामुक्त महाराष्ट्र – लक्ष्यवेध १.० अभियानाचा शुभारंभ वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय नार्को समन्वय समितीची बैठक वर्षा निवासस्थान येथे झाली. नशामुक्त हे अभियान राज्यात राबविण्यात येत असून, यासाठी शासनाच्या सर्व विभागांचा समन्वित सहभाग घ्यावा.
विविध विभागांच्या समन्वयातून अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, या अभियानांतर्गत शासनाच्या सर्व विभागांचा समन्वित सहभाग असलेला सर्वंकष दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
अंमली पदार्थांची निर्मिती करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता नसल्याने जुन्या कारखान्यांमध्ये, घरांमध्ये किंवा छोट्या जागांमध्येही त्यांचे उत्पादन केले जात असल्याचे आढळते. या अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पैसा असल्यामुळे विविध यंत्रणांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होतात. विशेषतः १४ ते २४ वयोगटातील तरुणांचा अंमली पदार्थांच्या सेवनासाठी तसेच वितरणाच्या साखळीत वापर केला जात आहे.
अल्प पैशांच्या आमिषाने तरुणांना या अवैध व्यवहारात ओढले जात आहे. त्यामुळे या समस्येकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा विषय म्हणून न पाहता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अमली पदार्थांविरोधातील लढाई केवळ पोलीस विभागाच्या माध्यमातून यशस्वी होऊ शकत नाही.
त्यासाठी पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच मागणी कमी करण्यासाठीही व्यापक उपाययोजना करणे आवश्यक आहे. पुरवठा साखळीतील विविध घटकांवर कारवाई करताना आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि जीएसटी विभागाची मदत घ्यावी. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.






