War injury pension : ‘स्वतःच्या बंदुकीतून किंवा सहकाऱ्याच्या गोळीबारात जखमी झाल्यासही…’; वॉर इंजुरी पेन्शन बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
जवानाच्या स्वतःच्या शस्त्रातून चुकून गोळी सुटून किंवा स्वतःच्याच तुकडीच्या गोळीबारात तो जखमी झाल्यासही त्याला वॉर इंजुरी पेन्शनचा लाभ मिळायला हवा

War injury pension – वॉर इंजुरी एलिमेंट (युद्धात झालेल्या जखमेचा घटक) अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी जवानाला शत्रूच्या गोळीनेच जखमी होणे आवश्यक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एखाद्या मोहिमेदरम्यान जवानाच्या स्वतःच्या शस्त्रातून चुकून गोळी सुटून किंवा स्वतःच्याच तुकडीच्या गोळीबारात तो जखमी झाल्यासही त्याला वॉर इंजुरी पेन्शनचा लाभ मिळायला हवा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. लष्कराच्या आदेशांमध्ये दोन बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे, पहिली म्हणजे अपघाताने गोळी लागणे किंवा स्प्लिंटरमुळे (तुकड्यामुळे) दुखापत होणे आणि दुसरी म्हणजे स्वतःच्याच जवानांच्या गोळीबारात जखमी होणे. दोन्ही स्थितींमध्ये ही दुखापत शत्रू किंवा अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईदरम्यान झालेली असणे गरजेचे असल्याचे खंडपीठाने नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, स्वतःला इजा पोहोचवण्याच्या हेतूशिवायही सर्व्हिस शस्त्रातून अपघाताने गोळी सुटू शकते. शस्त्र हाताळताना धक्का लागल्यामुळे, खाली पडल्यामुळे, ट्रिगर अडकल्यामुळे, नकळत ट्रिगरवर दाब आल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे अशी घटना घडू शकते. अशा अपघाती घटनांना जाणूनबुजून किंवा इरादतन स्वतःला दुखापत करण्याच्या प्रकारात धरता येणार नाही, ज्यामुळे वाढीव पेन्शनसाठी अपात्र ठरवले जाते.
काय आहे प्रकरण?
ऑगस्ट २००२ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन रक्षक / ऑपरेशन पराक्रम दरम्यान जखमी झालेले सुभेदार मेजर आणि मानद लेफ्टनंट देवी सिंग यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली. त्या वेळी त्यांच्याच बंदुकीतून चुकून गोळी सुटली होती, जी त्यांच्या मांडीतून गेल्याने गंभीर इजा झाली.
या घटनेमुळे ते ४० टक्के दिव्यांग ठरले आणि त्यांना केवळ सामान्य अपंगत्व पेन्शन देण्यात आली. वाढीव पेन्शनसाठी त्यांनी केलेला दावा सशस्त्र दल न्यायाधिकरणाने फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाचा तो आदेश रद्द ठरवत देवी सिंग यांना पेन्शनचा वाढीव लाभ देण्याचे निर्देश दिले.






