Devendra Fadnavis : सरकार कोसळेल हे राहुल गांधींचे दिवास्वप्न; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका
एनडीए सरकार लवकरच कोसळेल हा राहूल गांधी यांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी फेटाळून लावला. राहुल गांधी यांचे हे केवळ दिवास्वप्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis : एनडीए सरकार लवकरच कोसळेल हा राहुल गांधी यांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी फेटाळून लावला. राहुल गांधी यांचे हे केवळ दिवास्वप्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपने आरोप केला की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत मोदी सरकार एका वर्षाच्या आत कोसळेल असे विधान केले होते.
या विधानाबाबत विचारले असता, फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, पूर्वी मुंगेरीलाल के हसीन सपने (दिवास्वप्न) नावाची एक लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका होती. त्यांचे हे विधान त्यापेक्षा वेगळे काहीही नाही. नागपूर येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते.
फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत आपण ज्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन केले आहे, त्यापासून या भागातील उत्पादन क्षेत्राला प्रचंड फायदा होणार आहे.
जर आपण अलीकडील घडामोडींकडे पाहिले, तर आम्ही लागू केलेल्या सर्वसमावेशक लॉजिस्टिक्स धोरणामुळे नागपूरचे रूपांतर एका राष्ट्रीय लॉजिस्टिक्स केंद्रामध्ये (हबमध्ये) झाले आहे.
भारतीय व्यवसायांना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी खर्च कमी करणे आवश्यक आहे. जर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनायचे असेल आणि जागतिक पुरवठा साखळीत आपले स्थान निश्चित करायचे असेल, तर लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणे अत्यावश्यक आहे. नेमके हेच साध्य करण्यासाठी आम्ही आज या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.






