Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत एक मोठे आणि महत्त्वपूर्ण राजकीय विधान केले आहे. आगामी वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदत्याग निश्चित असल्याचे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसच्या सूत्रांनुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाची आर्थिक स्थिती आणि देशांतर्गत वाढता असंतोष या कारणांमुळे हे घडेल, असा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला असून ही बदलती परिस्थिती भारतीय राजकारणावर खोल परिणाम करेल, असे ते म्हणाले. या बैठकीदरम्यान काही नेत्यांनी ‘मुस्लीम’ या शब्दाऐवजी ‘अल्पसंख्याक’ शब्द वापरण्याचा सल्ला दिला होता. मात्र, राहुल गांधी यांनी याला स्पष्ट विरोध करत कोणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. हिंदू, दलित, उच्चवर्णीय, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध किंवा जैन अशा कोणत्याही समाजावर अन्याय होत असेल, तर काँग्रेसने उघडपणे त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. याच बैठकीत काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी पक्षाच्या रणनीतीबाबत एक महत्त्वाचा विचार मांडला. मुस्लीम समाज फक्त भाजपला हरवण्यासाठीच मतदान करतो, हा समज आता पक्षाने बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. Rahul Gandhi काँग्रेसने मुस्लीम समाजासाठी केलेल्या भरीव कामांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवून मतांचा अधिकार मागितला पाहिजे, जेणेकरून भाजपला बहुसंख्याकांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण करण्याची संधी मिळणार नाही, असे मसूद यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही नेत्यांनी राहुल गांधींकडे (Rahul Gandhi) एक तक्रारही केली. राहुल गांधी ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर उघडपणे बोलतात, तसे पक्षातील इतर ज्येष्ठ नेते बोलणे टाळतात, त्यामुळे इतर नेत्यांनीही या मुद्द्यांवर जाहीर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी आयोजित केलेली ही बैठक जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ चालली. देशातील सर्व प्रमुख अल्पसंख्याक घटकांना प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने या बैठकीत मुस्लीम समाजाव्यतिरिक्त शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन समाजाच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये शीख समाजाचे प्रतिनिधित्व करत गुरदीप सप्पल, ख्रिश्चन समाजाकडून हिबी, बौद्ध समाजातून राजेंद्र पाल गौतम आणि जैन समाजाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी प्रामुख्याने उपस्थित होते.