Maharashtra Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी
महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे.

Maharashtra Farmer Loan – महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेतील दुसरा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात 5086 कोटी रुपये वर्ग करत 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.
राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर पहिल्या टप्प्यात 7 ऑगस्टला 5029 कोटी वितरीत करत 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. आज दुसऱ्या टप्प्यात 6 लाख 36 हजार 36 पात्र शेतकऱ्यांना 5086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून कर्जमाफी योजनेसाठी टप्प्या टप्प्याने निधी वितरीत केला जात आहे. या कर्जमाफीमध्ये साधारणपणे 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे. तर, 23 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे.
राज्य सरकाकडून आतापर्यंत दोन टप्प्यात 10115 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ 12 लाख 58 हजार 243 शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक असून, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत नियंत्रित केली जात आहे, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.





