Aditi Tatkare : अंगणवाडीच्या आहार गुणवत्तेशी तडजोड नाही; मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
महिला व बालकल्याण विभागाने बालकांच्या पोषणाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची ४८ तासांत तपासणी करा, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिले आहेत.

Aditi Tatkare : राज्यातील अंगणवाड्यांमध्ये देण्यात येणारा शासकीय पोषण आहार निकृष्ट असल्याची तक्रार सातत्याने होत असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील एका अंगणवाडी सेविकेने विद्यार्थ्यांसाठी दिला जाणारा वाटाणा किती निकृष्ट आहे, हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर, संबंधित अंगणवाडीसेविकाचे निलंबन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
आता, महिला व बालकल्याण विभागाने बालकांच्या पोषणाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची ४८ तासांत तपासणी करा, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिले आहेत. 9 ते 10 शिट्या काढूनही न शिजणारा पांढरा वाटाणा आणि शिजवूनही कच्चा राहणारा भरडा आम्ही लहान मुलांना कसा खाऊ घालायचा? असा प्रश्न एका अंगणवाडी सेविकेने उपस्थित केला होता.
अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना या निकृष्ट अन्नावर तात्काळ बंदी घालण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, त्यांच्यावरच प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती.
बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे आणि त्यांना उत्तम पोषण पुरवणे याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य आहे. अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून बालकांना पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा उत्तम आणि सुरक्षित राहावा, यासाठी तटकरे यांनी संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहून कडक पावले उचलण्याचे निर्देश (Aditi Tatkare) दिले आहेत.
निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई
तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले आहे की, या तपासणी मोहिमेनंतर जर पोषण आहाराबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची असणार आहे. आहाराच्या दर्जाबाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.






