Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थींवर आता कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने घेतलेली रक्कमही वसूल केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. (Ladki Bahin Yojana) एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेतील लाभार्थींना 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता संबंधित विभागांकडून अशा लाभार्थी महिलांची माहिती मागवण्यात आली असून त्यांनी ई-केवायसी का केली नाही, याची चौकशी केली जाणार आहे. (Ladki Bahin Yojana) गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कारवाई “काही महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतला आहे. तसेच काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा सर्वांवर कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून लाभाची रक्कम परत वसूल केली जाईल,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (Ladki Bahin Yojana) अपात्र ठरलेल्या महिलांना दिलासा? ई-केवायसीनंतर काही महिलांचे लाभ बंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अनेक तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. काही महिलांच्या नावावर प्रत्यक्षात वाहन नसतानाही आरटीओच्या डेटामध्ये त्यांचे नाव दिसत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. (Ladki Bahin Yojana) याबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, संबंधित महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर केल्यानंतर पडताळणी केली जाईल. चौकशीत त्या पात्र आढळल्यास त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येईल. (Ladki Bahin Yojana)