Sunetra Pawar: पर्यावरणाच्या रक्षणाबाबत तडजोड नको
Sunetra Pawar:

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; आरएमसी प्रश्नाबाबत बैठक
Sunetra Pawar: पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण या दोन्ही बाबींशी कोणतीही तडजोड होता कामा नये, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे रेडी मिक्स काँक्रीटबाबत प्रश्न आणि उपाययोजनांचा आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरणातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणविषयक विषयांचाही आढावा घेतला. या वेळी आमदार सुनील शेळके, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
पवार म्हणाल्या, की पर्यावरण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असून, या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेता प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला बाधा पोहोचेल, अशा बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
राज्य शासन आणि केंद्र शासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेले नियम व कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभाग, यंत्रणा आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत सातत्याने बैठका घेऊन आढावा घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
शाळा, रुग्णालये आणि निवासी परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने काम करावे, असेही त्या म्हणाल्या.





