Pune Zilla Parishad: जिल्हा परिषदेच्या विकासकामांना वेग!
Pune Zilla Parishad:

धाराशिव पॅटर्ननुसार प्रभाग समित्या पुन्हा कार्यरत होणार
Pune Zilla Parishad: जिल्हा परिषदेच्या विकासकामांना प्रशासकीय दिरंगाईतून बाहेर काढत गावागावांतील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रभाग समित्या पुन्हा एकदा निर्माण होणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या यशस्वी पॅटर्नच्या धर्तीवर पुण्यातही या समित्या कार्यान्वित करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी केली.
सन २०१७ ते २०२२ या कालावधीत प्रभाग समित्यांनी बजावलेली भूमिका अत्यंत प्रभावी ठरली होती. प्रशासकीय अडथळे, निधी वितरणातील समस्या आणि विविध विभागांतील समन्वयाचा अभाव यावर या समित्यांमध्ये थेट तोडगा निघत असे. या समित्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि अधिकारी आमनेसामने येत असल्याने उत्तरदायित्व वाढून कामांच्या गुणवत्तेवरही थेट देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
समित्यांच्या पुनर्गठनानंतर बांधकाम, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि कृषी अशा थेट जनतेशी निगडित विभागांच्या कामांचा एकत्रित आढावा घेतला जाईल. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधी वाटपानंतर या समित्यांच्या कामकाजाला खऱ्या अर्थाने धार येईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
जिल्हा परिषद सदस्यांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत प्रशासनाला कार्यपद्धती आणि बैठकांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभाग समित्यांमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील दुरावा मिटून गावपातळीवरील रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, तसेच विकासकामांना वेग येणार आहे.
– वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद





