Pune News : नोव्हेंबर ते जूनसाठी १३ टीएमसी पाणी द्या.! भिमाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पावसाळ्यात कालवा आणि नदीद्वारे १९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. सध्या धरणसाखळीत २४ टीएमसी पाणीसाठा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्यास पाण्याची मागणी आणखी वाढेल.

Pune News : पावसाळ्यात धरणातून कालवा आणि नदीद्वारे सोडण्यात येणारे पाणी पुणे महापालिकेच्या वार्षिक कोट्यात धरू नये. तसेच १ नोव्हेंबर २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी स्वतंत्रपणे १३ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भिमाले यांनी बुधवारी पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले.
पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत शहरासाठी १३.२ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. हा कोटा १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत यापैकी ६.३५ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत केवळ ७.१५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.
पुणे शहराची लोकसंख्या ७० लाखांवर गेली असून, दरमहा सुमारे १.५ टीएमसी पाण्याची गरज आहे. १० टक्के पाणीकपात लागू असतानाही पुढील आठ महिन्यांसाठी सुमारे १२ टीएमसी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे मंजूर कोटा अपुरा पडण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे यंदा शंभर टक्के भरली होती.
पावसाळ्यात कालवा आणि नदीद्वारे १९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. सध्या धरणसाखळीत २४ टीएमसी पाणीसाठा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्यास पाण्याची मागणी आणखी वाढेल. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी वार्षिक कोट्यातून वगळून नोव्हेंबर ते जूनसाठी १३ टीएमसी पाणी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भिमाले यांनी केली आहे.






