Pune News : मुकुंद नगर, महर्षी नगर परिसरात नागरी समस्या ऐरणीवर; राजकीय प्रसिद्धीसाठी पालिकेच्या निधीचा अपव्यय
प्रभाग क्रमांक २१ (मुकुंद नगर, सॅलसबरी पार्क, महर्षी नगर आणि मार्केट यार्ड परिसर) मधील नागरिकांच्या (Pune News) मूलभूत आणि प्राथमिक समस्या सोडवण्याऐवजी, परिसरात आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नगरसेवकांकडून करदात्यांच्या पैशांची नाहक उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

Pune News : प्रभाग क्रमांक २१ (मुकुंद नगर, सॅलसबरी पार्क, महर्षी नगर आणि मार्केट यार्ड परिसर) मधील नागरिकांच्या (Pune News) मूलभूत आणि प्राथमिक समस्या सोडवण्याऐवजी, परिसरात आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नगरसेवकांकडून करदात्यांच्या पैशांची नाहक उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज लाईनचे प्रश्न आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा यांसारख्या गंभीर समस्यांनी (Pune News) नागरिक त्रस्त असताना, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत भर पावसात भिंती रंगवण्याचा कारभार सुरू असल्यामुळे स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्वयं-जाहिरातबाजीसाठी भागांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न?
प्रभागातील (Pune News) रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी वाहिनी आणि पदपथांचे काम यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या मूलभूत समस्यांवर काम करण्याऐवजी स्वतःचे नाव, संकल्पना आणि सौजन्य अशा गोंडस नावांच्या पाट्या मारून सार्वजनिक भिंती रंगवण्यावर भर दिला जात आहे. परिसरात आपले नाव कोरून एका प्रकारे ठराविक भागांवर वर्चस्व आणि ताबा प्रस्थापित करणे हाच या रंगरंगोटीमागील मुख्य हेतू असल्याची जोरदार चर्चा सध्या संपूर्ण प्रभागात रंगली आहे.
हलक्या दर्जाचे काम; पावसामुळे रंग रस्त्यावर पसरला
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या महर्षी नगरकडून (Pune News) मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर, आदिनाथ सोसायटीच्या मागील परिसरात सध्या हे रंगकामाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, मुसळधार पाऊस सुरू असतानाही हे काम घाईघाईने उरकले जात आहे.
पावसामुळे अनेक भिंतींवर दिलेला रंग वाहून थेट रस्त्यावर आला असून, संपूर्ण परिसराला अवकळा आली आहे. अत्यंत हीन दर्जाच्या होत असलेल्या या कामावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा किंवा प्रशासनाचा कोणताही अंकुश उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे.
नागरिकांच्या कराच्या पैशांची उधळपट्टी
पावसाळ्यात भिंती रंगवण्याचे काम टिकणार नाही हे माहीत असतानाही, महापालिकेच्या (Pune News) तिजोरीतून लाखो रुपये या निरुपयोगी कामावर उधळले जात आहेत. “एकीकडे शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि ड्रेनेज लाईन तुंबून दुर्गंधी पसरत आहे; पण लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाला मात्र स्वतःच्या प्रसिद्धीची घाई झाली आहे,” अशा शब्दांत त्रस्त नागरिकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला आहे.
या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच नागरी समस्या प्राधान्याने सोडवण्यात याव्यात, अशी ठाम मागणी प्रभाग २१ मधील रहिवाशांकडून केली जात आहे.






