Pune News : अंजू शेंडे पुण्याच्या नवीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश
पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश म्हणून अंजू एस. शेंडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यांनी २०१० मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून न्यायसेवेत प्रवेश केला.

Pune News – पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश म्हणून अंजू एस. शेंडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यांनी २०१० मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून न्यायसेवेत प्रवेश केला.
त्यांनी अमरावती येथे केंद्रीय अन्वेषण विभागाचे न्यायालय, मुंबई येथे कौटुंबिक न्यायालय, महिलांवरील अत्याचार निवारण न्यायालय, पोक्सो न्यायालय आणि ‘सेबी’च्या विशेष न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
मुंबई येथील लघुवाद न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायाधीश, नागपूर येथील औद्योगिक न्यायालयात सदस्य आणि वर्धा येथे विशेष पोक्सो न्यायाधीश म्हणून काम केले. त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निबंधक होत्या; तसेच त्यांनी बीड, भंडारा आणि उस्मानाबाद येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
न्यायसेवेपूर्वी त्यांनी ‘सर्च’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेसमवेत आदिवासी महिलांच्या आरोग्यावर काम केले आहे. दरम्यान पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष काळूराम भुजबळ आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.





