Pune Ganeshotsav: पुण्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव, डीजे दणाणणारच !
Pune Ganeshotsav:

महापालिकेतील गणेशोत्सव तयारी बैठकीत एकमताने शिक्कामोर्तब
Pune Ganeshotsav: यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होणार असून, ढोल आणि डीजे दोन्हीही दणाणून वाजणार आहेत. महापालिकेत झालेल्या गणेशोत्सवाच्या तयारीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने झाला असून, डीजे आणि ढोलांच्या बाजूने असलेल्या कार्यकर्त्यांचे पारडे जड झाल्याने, त्याला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना सभागृहाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
ही बैठक महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, काँग्रेस गटनेते चंद्रकांत कदम, पोलीस सहआयुक्त सचिन दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव निर्बंधमुक्त असावा, जर एसओपी बनवायची असेल, तर एक जानेवारी २०२७ पासून बनवावी आणि ती केवळ गणेशोत्सवच नव्हे तर सर्व सणांना लागू असावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. साउंडवर निर्बंध आणू नका; परंतु वेडेवाकडे नाचणे आणि गाणी कोणती वाजवावीत, याचा विचार आणि भान कार्यकर्त्यांनी बाळगले पाहिजे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
विसर्जन परवाने दोन दिवसांसाठी हवेत, पुरेशी शौचालये हवीत, मुंबईतील भुलेश्वर येथे घडलेल्या गणेशमूर्तीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, ड्रग्जविरोधी मोहीम राबवावी, प्रबोधन करावे, पुण्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर स्वागत कमानी बसवाव्यात, पूर्वभागात येण्यापासून भाविकांना बॅरीकेडींग करून मज्जाव केला जातो. त्यामुळे पोलिसांनी गर्दीचे योग्य नियोजन करावे, परवानगीसाठी एक खिडकी योजना आणि ऑनलाइन अशा दोन्ही सुविधा निर्माण कराव्यात. मंडळांमध्ये लावलेल्या जाहिरातींचे शुल्क आकारू नये, अशा अनेक मागण्या या वेळी मंडळांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आल्या.
महापौरांचे घूमजाव
आपली डीजे विरोधी भूमिका ठाम आहे, असे काही दिवसांपूर्वी महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले होते. तशी दोनदा घोषणाही त्यांनी केली होती. वारीवेळीही त्यांनी तसे आवाहन केले होते. मात्र, महापौरांनी आता घूमजाव करत महापालिका आणि पोलीस निर्णय घेतील. दोघांनी मिळून एसओपी तयार करण्याची गरज आहे. त्यानंतर त्यात डाॅल्बीच्या किती भिंती असाव्यात, आवाजाची मात्रा किती डेसीबल असावी, याविषयी निर्णय घेऊन त्याची पुढच्या वर्षी अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.
…तर पुण्याबाहेर जाऊन राहा
स्पीकर, डीजे, ढोलांच्या आवाजाचा आम्हाला त्रास होतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी हद्दपार कराव्यात, अशी भूमिका एका पर्यावरणप्रेमीने सुरुवातीलाच केल्याने सभागृहात गदारोळ झाला. ही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक असून, पर्यावरणप्रेमींची वेगळी बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे मत या वेळी मांडण्यात आले. त्यामुळे या पर्यावरणप्रेमींना बाहेर काढण्यात आले. आपल्याला याचा त्रास होतो, तर आपण या कालावधीत पुण्याबाहेर जाऊन राहावे, आपल्या जेवणाची व्यवस्था केली जाईल, असे उपरोधिक वक्तव्य एका डीजे समर्थक प्रतिनिधींनी केले. गदारोळ झाल्याने महापौरांनी उपस्थितांना शांत केले; परंतु महापालिका सुरक्षारक्षकांनी बाजू मांडण्यासाठी धडपडणाऱ्या पर्यावरणप्रेमींना सभागृहाबाहेर काढले.
दहिहंडी परवानगीची वेळ वाढवा
दहिहंडीची वेळ ही १० ऐवजी १२ वाजेपर्यंत करावी, अशी मागणी या वेळी कार्यक्रत्यांनी केली आहे. यावर जिल्हाधिकारी निर्णय घेतील. त्यांनी परवानगी दिली, तर आम्ही त्याची अंमलबजावणी करू, असे सचिन दराडे यांनी सांगितले.





