Pune News : पुण्यात गुन्हेगारी खपवून घेणार नाही; सुनेत्रा पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले
Pune News : पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा घेतला. कोयता गँग, ड्रग्ज माफिया आणि अवैध शस्त्रधारकांवर कठोर कारवाईचे पोलिसांना निर्देश दिले.

Pune News : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहावे. गुन्हेगारी प्रवृत्ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोयता गँग, ड्रग्ज माफिया आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पोलिस प्रशासनाला दिले. (Pune News)
शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. (Pune News)
शिवाजीनगर न्यायालय परिसरातील हल्ल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगून सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी आधीपासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा. गुन्हेगारी हालचालींची माहिती मिळवणारी यंत्रणा अधिक सक्षम करावी. (Pune News)
शहरातील सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांसह कोयता गँग आणि अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठीही आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. (Pune News)
न्यायालय परिसरातील घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. मात्र, या घटनेतून पोलिसांनी धडा घेऊन कामकाजात सुधारणा करावी. आगामी काळात पोलिसांचा धाक आणि दबदबा नागरिकांना दिसला पाहिजे, असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
पुण्याची शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावीपणे काम करावे. यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.





