Price of flowers: श्रावणात फुलांचा ‘भाव’ कोमेजला!
Price of flowers:

झेंडू, शेवंतीची आवक वाढली; आषाढाच्या तुलनेत दर ७० ते ८० टक्क्यांनी घसरले
Price of flowers: श्रावण महिना आणि फुलांची मागणी वाढण्याचे समीकरण आहे. विशेषत: झेंडू आणि शेवंतीला मोठी मागणी असते. परिणामी, दोन्हींचे भाव तेजीत असतात. तर एक महिना आधी आषाढ महिन्यात फुलांना मागणी नसते.
भावही कमी मिळतात. मात्र, या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. लागवड वाढल्यामुळे उत्पन्नात झालेली वाढ, त्यातच शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या माल मोठ्या प्रमाणात मार्केट यार्डातील फूल बाजारात दाखल होत आहे. आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे झेंडू आणि शेवंतीला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आषाढच्या तुलनेत अवघा २० ते ३० टक्केच भाव मिळत आहे.
सण, उत्सव, व्रत आणि उपवासाचा महिना अशी श्रावण महिन्याची ओळख. या महिन्यात घरगुती ग्राहकांसह देवस्थानच्या ठिकाणाहून फुलांना मागणी जास्त आहे. त्यामुळे या महिन्यात फुले बाजारात आणण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतात.
यंदा जिल्ह्यासह पुणे विभागात फुलांची लागवड वाढली आहे. त्यातच शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या मालामुळे एकदमची फुलांची आवक वाढली आहे. त्यामुळे भावात घसरण झाली आहे. पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सातारा जिल्ह्यांतून फुलांची आवक होत आहे. बाजारात सोमवारी (दि. २४) झेंडूची २५ ते ४० टन, तर शेवंतीची १५ ते २० टन आवक झाली.
अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे भिजलेला आणि दर्जाहीन माल बाजारात येत आहे. ग्राहकांकडून सुक्या मालाला मागणी आहे. त्यामानाने सुक्या मालालाही भाव कमी मिळत आहे. भावाविषयी बावधन (ता. वाई, जि. सातारा) येथील शेतकरी दीपक तरटे म्हणाले की, भाव कमी मिळत असल्याने वाहतूक खर्च सोडा उत्पादन खर्चही मिळणे अवघड झाले आहे.
दरवर्षी आषाढ महिन्यापेक्षा श्रावण महिन्यात फुलांना उठाव असतो. परिणामी, भाव जास्त मिळतो. मात्र, यंदा आवक जास्त होत असल्याने परिस्थिती बदलली आहे. भाव कमी मिळत आहे.
– सागर भोसले, समन्वयक, अखिल पुणे फूल बाजार आडते असोसिएशन
उत्पादन वाढल्यामुळे यंदा मागील श्रावण महिन्याच्या तुलनेत २० ते २५ टक्के फुलांची आवक जास्त होत आहे. त्या तुलनेत गिऱ्हाईक कमी असून, फुलांना अपेक्षित उठाव नाही.
– संतोष कुंभारकर, फूल विभागप्रमुख, पुणे बाजार समिती
फुलांचा प्रकार श्रावणातील १ किलोचा भाव आषाढातील १ किलोचा भाव (रुपयांमध्ये)
झेंडू १० ते २० – ५० ते ८०
शेवंती ३० ते ४० -१०० ते १५०





