Nursing CET 2026 – राज्य सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेण्यात येणाऱ्या नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बीएस्सी नर्सिंग, जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम), डिप्लोमा इन सायकॅट्रिक (डीपीएन) आणि पब्लिक हेल्थ नर्सिंग (पीएचएन) या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी २४ जानेवारी २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. इच्छुक उमेदवारांना २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करता येतील.गेल्या काही वर्षांत नर्सिंग क्षेत्राकडे वाढता कल पाहता यावर्षीही मोठ्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२५ च्या नर्सिंग सीईटीसाठी ४७ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर डीपीएन व पीएचएन या पदविकांसाठी ४७७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यामुळे यंदाही नोंदणीसाठी महिनाभराचा कालावधी दिला आहे. नर्सिंगसोबतच राज्यामध्ये इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेनेही वेग घेतला आहे. सध्या एमएचटी-सीईटी, एमबीए, एमसीए, ३ व ५ वर्षीय एलएलबी, बी.एड., एम.एड., बी.पी.एड., एम.पी.एड., तसेच बीसीए, बीबीए आणि बी.डिझाइन यांसारख्या विविध अभ्यासक्रमांची नोंदणी आधीच सुरू झाली आहे. यातील फाइन आर्ट्स या अभ्यासक्रमाच्या नोंदणीलाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. या सर्व परीक्षांचे वेळापत्रक, ऑनलाइन अर्जाचा नमुना आणि सविस्तर माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, विद्यार्थ्यांनी वेळेत आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.