- 1019 केंद्रांवर लसीकरण; 1 लाख 89 हजार बालकांना “डोस’
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम रविवारी यशस्वी पार पडली. शहरामध्ये 1019 लसीकरण केंद्रावर 0 ते 5 वर्ष वयोगटातील 1 लाख 87 हजार 970 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
पल्स पोलिओ मोहिमेची सुरूवात सांगवी येथे महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी “ह’ प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, डॉ. किशोरकुमार हांडे, डॉ. सुप्रिया बिरादार, डॉ. श्रद्धा कोकरे, डॉ. तुषार जाधव, डॉ. अल्वी नासीर, डॉ. कुंदन पाटील, डॉ. गोविंदा नरके, पब्लिक हेल्थ नर्स अंजली नेवसे, सिस्टर इन्चार्ज स्नेहल करमरकर आदी उपस्थित होते.
शहरामध्ये पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी मनपा परिसरात 1019 लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. तसेच 8 विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 55 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 215 पर्यवेक्षक व 3042 लसीकरण कर्मचारी कार्यरत होते. यासोबतच मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, महापालिका क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, मनपा शिक्षक, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रीडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी झाले होते.
महापालिकेने शहरातील 5 वर्षांखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण 1019 लसीकरण केंद्रांची स्थापना केली होती. सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा 908 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 38 ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 73 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय करण्यात आली होती.
घरोघरी जाऊन होणार तपासणी
आजपासून महापालिका क्षेत्रातील 5 वर्षांखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण झाले आहे का याची खात्री करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणासाठी वापरण्यात येणारी लस जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणीत केलेली आहे. तसेच लसीकरण करणारे कर्मचारी प्रशिक्षीत आहेत. आपल्या घरातील व परिसरातील ज्या बालकांना पोलिओचा डोस द्यायचा राहिला असेल त्यांना घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.