Nursing Admission – राज्यात कधीकाळी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नर्सिंग शिक्षणाला यंदा खासगी महाविद्यालयांच्या स्तरावर मोठा फटका बसला आहे. सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अक्षरशः झुंबड उडालेली असताना, राज्यातील तब्बल ४७ खासगी नर्सिंग महाविद्यालयांना १० विद्यार्थ्यांचा आकडा गाठतानाही नाकीनऊ आले आहेत.धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील ७ महाविद्यालयांमध्ये यंदा एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. यंदा ५ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्याने खासगी शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहेत. सरकारी जागा ‘फुल्ल’, खासगी ‘ओस’ राज्यातील एकूण २९४ नर्सिंग महाविद्यालयांमध्ये (१७ सरकारी आणि २७७ खासगी) यंदा १६ हजार ५३० जागा उपलब्ध होत्या. यापैकी सरकारी महाविद्यालयांच्या १ हजार १८० जागांपैकी १ हजार १७४ जागा भरल्या गेल्या असून, तिथे केवळ ६ जागा शिल्लक आहेत. याउलट, खासगी महाविद्यालयांमधील १५ हजार ३५० जागांपैकी केवळ ९ हजार ७८३ जागांवरच विद्यार्थी मिळाले आहेत. परिणामी, खासगी संस्थांमधील ५ हजार ५६७ जागा रिक्त राहिल्या असून, एकूण रिक्त जागांचा आकडा ५ हजार ५७३ वर पोहोचला आहे. ७ महाविद्यालयांत शून्य प्रवेश शून्य ते १० प्रवेश झालेल्या ४७ महाविद्यालयांमध्ये सात महाविद्यालये अशी आहेत, जिथे प्रवेशाची बोहणीही झालेली नाही. यामध्ये बीड (३), यवतमाळ, नांदेड, नाशिक आणि ठाणे येथील प्रत्येकी एका महाविद्यालयाचा समावेश आहे. १० पेक्षा कमी प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची सर्वाधिक संख्या सांगली जिल्ह्यात आहे. सांगलीतील ७ महाविद्यालयांमध्ये हीच बिकट स्थिती आहे. त्या खालोखाल अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. प्रवेशाच्या बाबतीत सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. सर्वात कमी प्रवेश झालेल्या ४७ पैकी १६ महाविद्यालये एकट्या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये सांगलीतील ७ महाविद्यालये, कोल्हापुरातील ६ महाविद्यालये, सोलापुरातील २ महाविद्यालये आणि पुण्यातील एका महाविद्यालयाचा समावेश आहे. मराठवाड्यातही परिस्थिती चिंताजनक आहे. बीडमधील ४ महाविद्यालयांसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, जालना आणि परभणी अशा एकूण १२ महाविद्यालयांमध्ये अत्यंत कमी प्रवेश झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रातही अहिल्यानगरमधील ६ आणि नाशिकमधील २ महाविद्यालयांची अवस्था अशीच ‘शून्य ते दहा’ च्या दरम्यान आहे.