Khadakwasala Dam : खडकवासला धरणाचा विसर्ग बंद; चारही धरणांमध्ये 16.17 टीएमसी पाणीसाठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या (Khadakwasala Dam) पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाण्याची आवक मंदावली असून, खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्गही बंद करण्यात आला आहे.

Khadakwasala Dam : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या (Khadakwasala Dam) पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाण्याची आवक मंदावली असून, खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्गही बंद करण्यात आला आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चारही धरणांमध्ये एकूण १६.१७ टीएमसी (५५.४९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरूवारी दिवसभरात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण परिसरात (Khadakwasala Dam) पावसाची नोंद झाली नाही. तर टेमघर धरण परिसरात ८ मिमी पावसाची नोंद झाली.
त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवकही तुलनेने कमी राहिली. दरम्यान, खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, बुधवारी एका दिवसात धरणाच्या सांडव्यातून एकूण १.५१ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
धरणसाठयाची सद्यस्थिती
खडकवासला धरणात (Khadakwasala Dam) १.९४ टीएमसी (९८.४० टक्के), पानशेतमध्ये ६.१३ टीएमसी (५७.५८ टक्के), वरसगावमध्ये ६.७३ टीएमसी (५२.४९ टक्के) आणि टेमघरमध्ये १.३७ टीएमसी (३६.९७ टक्के) पाणीसाठा आहे. पाऊस थांबल्याने चारही धरणांमध्ये येणारी पाण्याची आवकही कमी झाली आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १९.८१ टीएमसी (६७.९७ टक्के) पाणीसाठा होता. तर या वर्षी तो १६.१७ टीएमसी आहे. तर मुठा नवीन उजव्या कालव्यातून पालखीसाठी ३५० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.






