Governor Jishnu Dev Varma: विद्यार्थ्यांनी रोजगार न शोधता उद्योजक व्हावे! राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे आवाहन
Governor Jishnu Dev Varma: सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत सोहळा उत्साहात; महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रदान.

Governor Jishnu Dev Varma – अभियंत्यांनी केवळ रोजगाराच्या शोधात न राहता इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करणारी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे व परीक्षा संचालक डॉ. यशोधरा हरिभक्त उपस्थित होते. याप्रसंगी ८८९ पदवी आणि ५८२ पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली, तर ३५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल म्हणाले, की सीओईपीने स्वच्छ ऊर्जा, एआय, सेमीकंडक्टर्स आणि हवामान बदल यांसारख्या जागतिक आव्हानांवर परिवर्तनात्मक उपाय शोधणारे नवोपक्रमाचे केंद्र बनावे. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी सीओईपीचे चिखली येथील २८ एकर परिसरात आयआयटीच्या धर्तीवर स्वतंत्र संशोधन केंद्र विकसित होत असल्याचे सांगून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्याचे सूचित केले.
तसेच, कॅम्पसमध्ये ४०० विद्यार्थिनींच्या क्षमतेचे नवीन वसतिगृह उभारण्याची घोषणाही केली. प्रारंभी कुलगुरू प्रा. भिरूड यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. विनायक पै यांनी संस्था उत्पादन-केंद्रित राष्ट्र उभारणीत मूलभूत संशोधनावर भर देत असल्याचे स्पष्ट केले.





