FDA: ऐन दिवाळीत पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ
FDA:

एफडीएच्या कारवाईत दोन टन मिठाई, फरसाणचा साठा नष्ट
FDA: दिवाळीच्या सणात मिठाई आणि फराळाच्या माध्यमातून पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए-फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनस्ट्रेशन) कारवाईतून समोर आले आहे.
पुणे विभागात राबविलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल २ हजार ५ किलो मिठाई, फरसाण आणि अन्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. या साठ्याची किंमत ३ लाख ७६ हजार ४०० रुपये आहे. यामध्ये बर्फी, भाकरवडी, मेथी पापडी, मलाई पेढा, फरसाण, मोतीचूर लाडू आणि बुंदी आदी फराळाच्या पदार्थांचा समावेश आहे.
दिवाळीच्या काळात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी काही ठिकाणी अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे अथवा भेसळयुक्त असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसेच अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांची निर्मिती आणि साठवणूक होत असल्याचेही आढळले.
अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन, पॅकिंगवरील लेबलिंगमधील त्रुटी तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि वाहतूक होत असल्याच्या बाबी तपासणीत निदर्शनास आल्या. त्यामुळे प्रशासनाने संबंधित ठिकाणांवरील अन्नसाठा जप्त केला.
नाशवंत आणि असुरक्षित असल्याचा संशय असलेले हे खाद्यपदार्थ पुणे महापालिकेच्या धनकवडी येथील कचरा प्रक्रिया केंद्रात नेऊन नष्ट करण्यात आले. अन्न व्यावसायिक आणि वाहतूकदारांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





