DPC Election: डीपीसी निवडणूक रखडली ; विकास निधीच्या वाटपावरून लोकप्रतिनिधी नाराज
DPC Election:

DPC Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन सात ते आठ महिने उलटले असले, तरी पुणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) निवडणूक अद्याप रखडल्याने जिल्ह्याच्या विकासकामांचे नियोजन आणि निधीवाटप ठप्प पडल्याचे चित्र आहे.
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाच या प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याची तीव्र नाराजी आता उघडपणे व्यक्त होत आहे. डीपीसीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत यंदाच्या निधीचे वितरण आणि खर्च थांबविण्यात यावा, अशी भूमिका काही सदस्यांनी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विकासकारण चांगलेच तापले आहे.
जिल्हा नियोजन समितीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधून २०, जिल्हा परिषदेतून १८, तर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषदांमधून दोन सदस्य निवडून जातात.
विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवणे, प्रस्तावांना मंजुरी देणे आणि मतदानाचा अधिकार या निवडून आलेल्या सदस्यांकडे असतो. याउलट आमदार आणि खासदार हे केवळ विशेष निमंत्रित सदस्य असून, त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. मात्र, सध्या निवडून आलेल्या प्रतिनिधींचा सहभाग नसल्याने स्थानिक पातळीवरील गरजा आणि प्रश्न मांडणाऱ्यांनाच डावलले जात असल्याची भावना बळावली आहे.
सर्वसामान्यांच्या मूलभूत सोयीसुविधा आणि परिसरातील कामांसाठी मिळणारा निधी नेमका कसा आणि कोणाच्या निर्णयाने खर्च होतो, याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता व संभ्रम आहे.
निवडणूक का टाळली जात आहे, यामागे कोणाची भूमिका आहे आणि निधीवाटपात लोकप्रतिनिधींचा सहभाग का नाही, असे सवाल आता उपस्थित होत आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून डीपीसीचे तातडीने पूर्ण गठन करावे आणि त्यानंतरच लोकप्रतिनिधींच्या सहमतीने विकासकामांचा आराखडा निश्चित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, सध्या जिल्हा परिषद सदस्यांना नियोजन समितीच्या प्रक्रियेपासून आणि त्यांच्या वैधानिक हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. पालकमंत्र्यांनी तातडीने निवडणूक घेऊन जिल्हा परिषद सदस्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी केली आहे.
पद वाटपात तिढा? DPC Election:
राज्यातील महायुती सरकारमध्ये तीन पक्षांचा सहभाग असतानाही डीपीसीवरील शासननियुक्त आणि राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नेमणुका अद्याप रखडलेल्या आहेत. राजकीय गणिते आणि पदांच्या वाटपातील तिढ्यामुळेच निवडणूक लांबणीवर पडली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत नियोजन विभागानेही अद्याप कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे सध्या मर्यादित प्रशासकीय यंत्रणा, पालकमंत्री, तसेच आमदार आणि खासदार यांच्या स्तरावरच निधीवाटप व नियोजनाचे निर्णय होत असल्याचा आरोप सदस्यांकडून केला जात आहे.





