Diwali Savings Market: दिवाळी बचत बाजारात ७० लाखांची उलाढाल
Diwali Savings Market:

महापालिकेने बचत गटांतील महिलांना विक्रीसाठी दिले हक्काचे व्यासपीठ
Diwali Savings Market: पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे आयोजित दिवाळी बचत बाजार प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या बचत बाजारात तब्बल ७० लाख ४ रुपयांच्या उत्पादनांची विक्री झाली आहे.
शहरातील १ हजार ४१५ बचत गटांतील महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.
याशिवाय दिव्यांग लाभार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंनाही नागरिकांकडून चांगली मागणी आहे. करोना संकटामुळे हे बचत बाजार बंद करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासकीय राजवटीत ते सुरू करण्यात आले होते.
महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शहरातील विविध भागांत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
सिंहगड रस्ता, उत्तमनगर, कर्वेनगर, बालगंधर्व रंगमंदिर, खराडी, कोथरूड, बिबवेवाडी, घोरपडी, वानवडी, वडगाव शेरी, कात्रज, वारजे माळवाडी आणि धानोरी येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा, शेव, अनारसे अशा पारंपरिक दिवाळी फराळासह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. याशिवाय कपडे, स्वेटर्स, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, मसाले, पापड, लोणची, अगरबत्ती, पणत्या, आकाशकंदील आणि सजावटीच्या वस्तूंचे स्टॉलही लावण्यात आले आहेत.
प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी, कापडी आणि लेदरच्या पिशव्यांची विक्रीही करण्यात असल्याचे समाज विकास विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले





