Aadhaar App: आधार ॲपमधून चेहरा पडताळणीचा पर्याय
Aadhaar App:

नोंदणीवेळी विलंब टाळण्यासाठी नोंदणी विभागाचा निर्णय
Aadhaar App: दस्तनोंदणीसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आधार पडताळणी बंधनकारक केली आहे. आयसारिता १.९ प्रणालीतील ऑनलाइन पडताळणी सुविधा बुधवारपासून (दि. ४) राज्यभर लागू करण्यात आली. यापुढे नोंदणी प्रक्रियेत सहभागी सर्व संबंधित व्यक्तींचे आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.
आधार पडताळणीसाठी यापूर्वी अंगठ्याच्या ठशांचा वापर होत होता. ठसे जुळण्यात अडचण आल्यास बुबुळांचे स्कॅनिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नव्या प्रक्रियेत अधिकृत आधार ॲपच्या माध्यमातून चेहरा पडताळणीचाही पर्याय देण्यात आला आहे, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिली.
नोंदणीवेळी विलंब टाळण्यासाठी नागरिकांनी कार्यालयात येण्यापूर्वीच ॲप उतरवून त्यातील नोंदणी पूर्ण करावी, मोबाइल पुरेसा भारित (चार्ज) ठेवावा आणि इंटरनेट सुविधा तपासावी. पडताळणीच्या वेळी संबंधित आधारधारकाने स्वतःचा मोबाइल घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण आणि माहितीची देवाणघेवाण याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून आवश्यक संमती घेण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या सुविधेसाठी नागरिकांकडे अँड्रॉइड ९ किंवा त्यापुढील अथवा आयओएस १६ किंवा त्यापुढील आवृत्तीचा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. मोबाइलमध्ये इंटरनेट सुविधा आणि कार्यरत कॅमेरा असावा. अधिकृत आधार ॲपमध्ये आधार क्रमांकाद्वारे नोंदणी, सिम पडताळणी आणि चेहरा पडताळणी आधीच पूर्ण केलेली असावी. ॲपमध्ये नोंदणीकृत सहा अंकी संकेतांकाने प्रवेश करता येणेही गरजेचे आहे.
अशी असेल प्रक्रिया
दस्तनोंदणी कार्यालयातील संगणकावर प्रथम संकेतचिन्ह तयार होईल. नागरिकाने ते आधार ॲपमधून चित्रित केल्यानंतर संमती देऊन चेहरा पडताळणी पूर्ण करायची आहे. पडताळणीचा निकाल कार्यालयातील संगणकावर तत्काळ दिसेल. ती यशस्वी झाल्यानंतर दस्तनोंदणीची पुढील प्रक्रिया करता येणार आहे.





