Social Media Viral : ‘माझं काय चुकलं?’ दगडांवर उमटला विषण्ण सवाल; वाचून प्रवासीही पडले विचारात
Social Media Viral : माळशेज घाटातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधले; पांढऱ्या रंगात लिहिलेल्या 'माझं काय चुकलं?' या संदेशामागील गूढ अद्याप कायम.

Social Media Viral – कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाट परिसरात सध्या एका गूढ घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. घाटातील अनेक ठिकाणी असलेल्या मोठ्या दगडांवर पांढऱ्या रंगात ‘माझं काय चुकलं?’ असे वाक्य ठळक अक्षरात लिहिल्याचे दिसून येत असून, या संदेशामुळे प्रवाशांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. हा संदेश नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने लिहिला आहे,
याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घाटातून प्रवास करणारे वाहनचालक आणि पर्यटक हे संदेश पाहून कुतूहलाने थांबत आहेत. अनेक जण या दगडांचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत असून त्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये या विषयावर विविध मते व्यक्त केली जात आहेत.
काहींच्या मते हे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील वेदनेतून किंवा नाराजीतून लिहिले गेले असावे, तर काहींनी यामागे एखादा सामाजिक संदेश दडल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, सार्वजनिक मालमत्तेवर अशा प्रकारे लिहिणे हे नियमांच्या विरोधात असल्याचेही बोलले जात आहे. प्रशासनाकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.




