Pimperkhed : पिंपरखेड येथे अखेर बिबट्या जेरबंद; गावकऱ्यांकडून सुटकेचा निश्वास
Pimperkhed : आतापर्यंत सुमारे ४६ बिबटे जेरबंद केले तर एक संशयित नरभक्षक बिबट्या ठार केला

Pimperkhed : सोमवारी (दि. २७) रोजी पहाटे मादी संवर्गातील बिबट्याला पिंपरखेड (ता. शिरूर) येथे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेला शालेय विद्यार्थी रोहन बोंबेच्या घटनास्थळापासून केवळ पाचशे फुटावर शेतकरी विशाल रोहिदास बोंबे यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे गावकऱ्यांकडून सुटकेचा निश्वास सुटला.
गेली अनेक दिवस आंबेवाडी आणि परिसरातील नागरिकांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी स्थानिकांच्या मागणीनुसार या भागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट जेरबंद झाला असुन वनरक्षक लहू केसकर, वनकर्मचारी महेंद्र दाते आणि बेस कॅम्प टीमच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली असुन अजूनही परिसरात बिबट असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविली आहे.
सुमारे ४६ बिबटे जेरबंद
सध्याच्या काळात अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्याचा मुक्त संचार या परिसरात वाढलेला असून पावसाळ्याचा दिवसात घडलेल्या घटनाचे प्रमाण अधिकचे आहे. या भागातून आजपर्यंत सुमारे ४६ बिबटे जेरबंद केले तर एक संशयित नरभक्षक बिबट्या ठार केला आहे. या आधीच्या काळात या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सर्व बिबट्याना वनविभागाने पकडून जेरबंद केले आहे.
मात्र या भागातून बिबट्याची संख्या कमी झाल्याने बाहेर परिसरातील बिबटे अन्नाच्या शोधात त्यांची जागा घेत असुन यापुढील काळात अशीच कारवाई वनविभागाकडून चालू राहणार आहे. मात्र नागरिकांनी लहान मुले व आपली काळजी घ्यावी तसेच बिबट निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन जुन्नरच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी केले आहे.
हेही वाचा:





