Leopard Captured: शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांचा संचार पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत असून वनविभाग सतर्क झाला आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील आंबेवाडी परिसरात मागील वर्षभरापासून पशुधनावर हल्ले करणाऱ्या तीन वर्षीय नर बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. आंबेवाडी परिसर हा बिबट्यांचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी शिवाजी देवराम वरे यांच्या शेतात स्थानिकांच्या मागणीनुसार लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट अडकला. यानंतर त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले. हेही वाचा – मुळशीतील भालगुडी-लव्हाळवाडीत भीषण आग; आठ घरे जळून खाक ही कारवाई सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या सूचनेनुसार, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक लहू केसकर व वनसेवक महेंद्र दाते यांनी केली. शिरूरच्या पूर्व भागात आधीच बिबट्यांची संख्या मोठी आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर वनविभाग सतर्क झाला असून आतापर्यंत सुमारे ४१ बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. उसतोडणीचा हंगाम संपल्यामुळे अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे मुक्तपणे फिरण्याची शक्यता वाढली आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावून कारवाई सुरू ठेवली जाईल, असे सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सांगितले.