Satara: खिंडवाडी परिसरातील पुणे -बंगळूरू महामार्गाची भौगोलिक रचना लक्षात घेता उंटाचा डोंगर परिसर ते जाणारी माळी परिसर या भागांमध्ये वनविभागाचा अच्छादित उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. बिबट्यांच्या सुरक्षिततेसाठी सातारा वनविभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हा प्रस्ताव दिला तरी तो अद्याप प्रलंबित आहे. याबाबत तीन स्मरणपत्रे देऊनही या महत्त्वाच्या विषयावर कार्यवाही झालेली नाही. सातारा शहर आणि परिसरामध्ये कास यवतेश्वर तेथून अजिंक्यतारा किल्ला उंटाचा डोंगर आणि महामार्ग ओलांडून जानाई मळाई परिसर हे बिबट्याचे अधिवास क्षेत्र आहे .तो मुख्य भ्रमण मार्ग असल्याने बिबट्या येथून सातत्याने ये जा करत असतो. मात्र केल्या काही दिवसापासून अजिंक्यतारा किल्ला परिसराला वणवा लावण्याचे प्रकार सुरू झाल्याने येथील प्राणी संपदेला मोठा धोका निर्माण झाला आहे. शनिवारी मध्यरात्री खिंडवाडी परिसरात महामार्ग ओलांडताना एक बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार झाला. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांमध्ये सहा बिबट्यांचा महामार्ग परिसरात अपघाती मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे वनक्षेत्राला बाधा येत आहे त्यामुळे तेथील सुरक्षित वन मार्ग तयार करून बिबट्यांचा भ्रमण मार्ग सुरक्षित करावा अशी मागणी होत आहे. याशिवाय सातारा वनविभागाने खिंड वाडी परिसरात वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे येथे वेग नियंत्रण करणारे रम्बलर्स बसवणे,येथील अपघाताचे हॉटस्पॉट ओळखून तेथे ट्रॅप कॅमेरे बसवणे आणि अलर्ट सिस्टीम यंत्रणात येथे कार्यान्वित करणे इत्यादी उपायोजना करणे गरजेचे आहे. तीन वेळा स्मरणपत्रे कार्यवाही नाही सातारा वनविभागाने बिबट्यांचे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी ओवर पास किंवा अंडरपास करण्याचे नियोजन केले आहे. मात्र महामार्ग ओलांडण्याकरता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची त्याला तातडीची मंजुरी आवश्यक आहे. याबाबत सातारा वनविभागाकडून तीन वेळा पाठपुरावा करण्यात येऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. खिंडवाडी अजिंक्यतारा परिसर गोळीबार मैदान यवतेश्वर या परिसरात बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले आहे. खिंडवाडी भागात महामार्गामुळे वन्य प्राण्यांचे अपघात होण्याचा धोका वाढला आहे या भागात लोखंडी जाळीचे ग्रील वन्यजीवांसाठी अंडरपास आणि वेग नियंत्रणाचे उपाय राबवण्याची तातडीची गरज आहे. अधिवास जपण्यासाठी इच्छाशक्ती दाखवावी सातारा जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळामध्ये चार कॅबिनेट मंत्री पदे मिळाले आहे .त्यामुळे जिल्ह्याचा राजकीय दबदबा कायम आहे .सातारा जिल्ह्यातील प्राण्यांचा अधिवास समृद्ध आहे .सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकीकडे वाघांची संख्या सात वर पोहोचलेली असताना दुसरीकडे बिबट्यांचे वाढत्या अपघात ही चिंतेची बाब आहे. त्याकरता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तातडीने पाठपुरावा करणे आणि त्यासाठी राजकीय दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.