Pune District : होमगार्डच्या मागण्यांचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन
Pune District : एखाद्या बंदोबस्ताचे मानधन मिळण्यासाठी चार ते पाच महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे मानधन दरमहा वेळेवर खात्यात जमा व्हावे, अशी मागणी जनकल्याण सेवा प्रतिष्ठानने केली.

अवसरी : महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांच्या विविध मागण्यासाठी जनकल्याण सेवा प्रतिष्ठानचे वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना मुंबई येथे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र होम गार्डच्या विविध मागण्यासाठी गृहराज्य मंत्री (शहरी) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांची जनकल्याण सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरज नंदकुमार ढवळे आणि मिलिंद सोनवणे यांनी भेट घेतली.
यावेळी होमगार्डच्या अडीअडचणी तसेच महाराष्ट्र होमगार्डच्या समस्या साहेबांसमोर मांडल्या. दोन्ही मंत्र्यांसोबतची चर्चा सकारात्मक झाली असल्याचे संस्थापक अध्यक्ष सूरज ढवळे यांनी सांगितले. महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांना मानधन वेळेवर देण्याची विनंती करण्यात आली. एखाद्या बंदोबस्ताचे मानधन मिळण्यासाठी चार ते पाच महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे मानधन दरमहा वेळेवर खात्यात जमा व्हावे, अशी मागणी जनकल्याण सेवा प्रतिष्ठानने केली.
२०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्डला १८० दिवस कामाचा जीआर काढला होता. त्यावर पाच महिन्यातच स्थगिती आणण्यात आली होती. ती स्थगिती उठवून १८० दिवसांचे काम त्वरित चालू करावे आणि महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांना जास्तीत जास्त ११ महिने काम कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती दोन्ही गृहराज्यमंत्र्यांना करण्यात आली.होमगार्डच्या मागण्या पूर्ण होण्याबाबत तलवकरच गृह खात्याकडून चांगली बातमी मिळेल.अशी आशा मिलिंद सोनवणे यांनी व्यक्त केली. दोन्ही गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या कामात लक्ष घातले असून शासन दरबारी हे काम नक्कीच पूर्ण होईल.असा विश्वास मिलिंद सोनवणे यांनी व्यक्त केला.





