Kalamb Rain: रुग्ण खाटावर, पाणी पायाखाली! कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरले पावसाचे पाणी; पाहा काय आहे परिस्थिती
Kalamb Rain: अपूर्ण सेवा रस्ता ठरतोय डोकेदुखी; वर्पेमळावस्ती आणि इंदिरानगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय.

Kalamb Rain – कळंब (ता.आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाचे पाणी रविवार, दि.२८ रोजी सायंकाळी शिरल्याने रुग्ण, कर्मचारी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. महामार्गालगत काही व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाला असून पाणी थेट आरोग्य केंद्राच्या परिसरात व इमारतीत शिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही हॉटेल व्यावसायिकांनी महामार्गाच्या कडेला अतिक्रमण केल्याने पावसाचे पाणी वळवले जात असून त्याचा फटका प्राथमिक आरोग्य केंद्राला बसत आहे.संबंधितांना अनेकदा सूचना देऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवावे, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.आगामी काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वस्त्यांमध्ये पाणी; नागरिक संतप्त.
आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे रविवार दि. २८ रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक रस्त्यावरील वाहते पाणी सेवा रस्त्यांचे काम अपूर्ण असल्यामुळे वर्पेमळावस्ती आणि इंदिरानगर वस्ती परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घरांमध्ये पाणी शिरल्याने दैनंदिन वापराच्या वस्तूंचे नुकसान झाले असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अपूर्ण असल्याने तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात न आल्यामुळे पावसाचे पाणी थेट वस्त्यांमध्ये शिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मागील पावसाळ्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र त्यावर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे उपसरपंच कमलेश वर्पे यांनी सांगितले.
महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होत असल्याचीही तक्रार स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने सेवा रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, तसेच अतिक्रमणांवर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कळंब ग्रामस्थांनी केली आहे.






