Pimpri Chinchwad Police : शहरात होणार ५ नवीन पोलीस ठाणी! गुन्हेगारांचे धाबे दणाणणार, काय आहे नवा प्रस्ताव?
Pimpri Chinchwad Police : झपाट्याने विस्तारणाऱ्या पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र 'परिमंडळ ४' प्रस्तावित; ५ नवीन पोलीस ठाण्यांमुळे गुन्हेगारीवर बसणार वचक.

Pimpri Chinchwad Police – झपाट्याने विस्तारत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने आणखी पाच नवीन पोलीस ठाणी आणि स्वतंत्र ‘परिमंडळ ४’ स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता आणि प्रतिसाद वेळ मोठ्या प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील वाढती लोकसंख्या, आयटी पार्क्स, औद्योगिक वसाहती आणि विस्तारणारे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेऊन हा प्रस्ताव सादर केला आहे. सध्या आयुक्तालयाच्या हद्दीत १८ पोलीस ठाणी आणि २ परिमंडळे कार्यरत आहेत. मात्र, हिंजवडी, चिखली, भोसरी आणि तळेगाव दाभाडे यांसारख्या भागांत नागरिकांना पोलीस मदतीसाठी मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागत होता.
ही समस्या दूर करण्यासाठी विद्यमान पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नवीन ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावानुसार पिरंगुट, जांभे, पिंपळे सौदागर, मोशी आणि देहूरोड (विभाजित) येथे नवीन पोलीस ठाणी सुरू करण्यात येणार आहेत. तसेच नव्या परिमंडळासाठी उपआयुक्त दर्जाचे अधिकारी आणि आवश्यक मनुष्यबळासह एकूण ९१३ नवीन पदांची निर्मिती होणार आहे.
या निर्णयामुळे गुन्ह्यांवर जलद कारवाई, घटनास्थळी पोलिसांचा तातडीने प्रतिसाद आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होणार आहे. सध्या हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, मंजुरी मिळताच शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रस्तावित नवीन पोलीस ठाणी:
– पिरंगुट पोलीस ठाणे
– जांभे पोलीस ठाणे
– पिंपळे सौदागर पोलीस ठाणे
– मोशी पोलीस ठाणे
– देहूगाव पोलीस ठाणे
असे वाढणार मनुष्यबळ
या नवीन विस्तारामुळे केवळ इमारतीच वाढणार नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती आणि पदनिर्मिती देखील होणार आहे. प्रस्तावानुसार: परिमंडळ ४ साठी स्वतंत्र पोलीस उप आयुक्त (DCP), सहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर कर्मचारी अशा एकूण ३३ पदांची मागणी करण्यात आली आहे. पाच नवीन पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी १०० ते १६० याप्रमाणे एकूण ९१३ नवीन पदे (पोलीस अधिकारी व अंमलदार) निर्माण केली जाणार आहेत.






