Moshi building collapse: मोशी कचरा डेपो दुर्घटना : नऊ जणांना वाचवले, एकाचा मृत्यू
Moshi building collapse: आठ कर्मचाऱ्यांचा शोध सुरू

Moshi building collapse: – बुधवारी (दि. ८) मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्यादरम्यान रात्री उशिरापर्यंत ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
अविरतपणे चालू असलेल्या या बचावकार्यातील शोधमोहीमेमध्ये गुरूवारी (दि. ९) एका कर्मचाऱ्याला अत्यवस्थ अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून त्यांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली.
या तीन मजली इमारतीपैकी दोन मजले गाडले गेले आहेत. या इमारतीमध्ये अंदाजे २३ नागरिक अडकले होते. सुरुवातीस अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला हे ५ नागरिक घटना घडल्यानंतर सुखरुप बाहेर पडले.
मात्र इमारतीत १८ व्यक्ती अडकून पडले असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ), भारतीय सेना दल, महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या बचावकार्य सुरू केले.
रात्री ८ पर्यंत या पथकाने सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह या ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
इमारतीत अडकून पडलेल्या उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबविण्यात आली. रात्री दीड वाजेपर्यंत बचावकार्यादरम्यान आणखी ३ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
यामध्ये विजय सपकाळ, भूषण पाटील, महेश राऊत यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. बचावकार्य सुरू असताना शोधमोहीम हाती घेण्यात आली. यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली.
शोध मोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या इतर नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये सकाळी ९ च्या सुमारास भावेश वाणी यांना बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेत असलेल्या वाणी यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी ते मृत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, अद्यापही इमारतीत अडकलेल्या अंदाजे ८ नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
नातेवाइकांचा जीव टांगणीला
ज्या कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले, त्यांच्या नातेवाइकांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर अजूनही आत अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांच्या जिवाची मात्र घालमेल सुरु आहे.
डोळ्यात अश्रू आणि मनात प्रचंड भीती, तणाव घेऊन कर्मचाऱ्यांचे नातेवाईक थांबले असून आपल्या आप्तेष्टास लवकरात लवकर सुखरुप बाहेर काढावे, यासाठी देवाचा धावा करत आहेत.
हेही वाचा:





