YCM Hospital: वायसीएम रुग्णालयातील औषधसाठ्यावर एफडीएचा छापा; निकृष्ट, संशयास्पद औषधांचा काळाबाजार उघड
जेजुरीतीलही औषधाच्या कारखान्यावर कारवाई, तब्बल १.९० कोटींचा साठा जप्त

पिंपरी – महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील सेंट्रल मेडिकल स्टोअरमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या औषधांच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या तपासणीत काही औषधे निकृष्ट दर्जाची आढळली, तर अनेक औषधांचे उत्पादन आवश्यक परवानगीशिवाय केल्याचे समोर आले. या प्रकरणी एफडीएने वायसीएम रुग्णालयातील मेडिकल स्टोअर आणि जेजुरी एमआयडीसीतील औषधनिर्मिती कारखान्यावर कारवाई केली. दोन्ही ठिकाणांहून तब्बल १ कोटी ९० लाख ३३ हजार ४८० रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
महापालिकेला दर करारांतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी औषध निरीक्षक एस. एस. बुगाड यांनी वायसीएम रुग्णालय परिसरातील सेंट्रल मेडिकल स्टोअरमधून औषधांचे नमुने घेतले होते. या नमुन्यांची तपासणी आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
त्यावेळी जेजुरी एमआयडीसीतील मेसर्स इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशन या उत्पादक संस्थेकडे काही औषधांच्या उत्पादनासाठी आवश्यक वैध परवानगी नसल्याचे आढळले. त्यानंतर एफडीएने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली.
औषधांच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी
औषधांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणात काही नमुने ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ म्हणजेच अमानक दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले. औषधांमधील घटकांचे प्रमाण, विरघळण्याची क्षमता, औषधांचे स्वरूप, वजनातील एकसमानता आणि लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्या. केअरझिंक, केअरगिल-२००, एलडीएलआर-५ आणि डोम्पेरिडोन यांसारख्या औषधांच्या गुणवत्तेबाबतही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
विशेष म्हणजे, काही औषधांच्या पाकिटांवर ‘केवळ शासकीय पुरवठ्यासाठी’ असा उल्लेख होता. मात्र, त्याच औषधांच्या उत्पादन प्रक्रियेत आवश्यक परवानगी आणि गुणवत्तेच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचे तपासात समोर आले.
१० प्रकारच्या औषधांचा साठा जप्त
औषधांचा पुढील पुरवठा आणि वापर रोखण्यासाठी औषध निरीक्षक एस. एस. बुगाड यांनी औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार वायसीएम सेंट्रल मेडिकल स्टोअरमधील १० प्रकारच्या औषधांचा साठा जप्त केला. या साठ्याचे अंदाजित बाजारमूल्य १ कोटी ७२ लाख ७५ हजार १२६ रुपये आहे.
जेजुरीतील कारखान्यातही कारवाई
या प्रकरणाची व्याप्ती केवळ वायसीएम रुग्णालयापुरती मर्यादित राहिली नाही. औषध निरीक्षक आर. एच. शेख यांनी ३० ऑक्टोबर रोजी जेजुरी एमआयडीसीतील संबंधित औषधनिर्मिती कारखान्याची तपासणी केली. तेथूनही औषधांचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याचे बाजारमूल्य १७ लाख ५८ हजार ३५४ रुपये आहे.
एकूण कारवाईचा तपशील
वायसीएम सेंट्रल मेडिकल स्टोअर : १ कोटी ७२ लाख ७५ हजार १२६ रुपये.
जेजुरी एमआयडीसी कारखाना : १७ लाख ५८ हजार ३५४ रुपये.
एकूण जप्त औषधसाठा : १ कोटी ९० लाख ३३ हजार ४८० रुपये.





