TOP 15 : भाजपाला धक्का देत काँग्रेसचा मोठा विजय ते ट्रम्प यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक; जाणून घ्या TOP १५ News…
TOP 15 News: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी

TOP 15 : १. विठ्ठल-रुक्मिणीची एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा मोठ्या भक्तिभावाने पार पडली. महापूजा पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी साकडं घातलं. माझ्याकडे येणारा संकटातील माणूस कोणताही रिकाम्या हाताने परत जाऊ नये, एवढेच मागणी मी कायम पांडुरंगाकडे मागत आलो आहे. बळीराजाला या अडचणीतून बाहेर काढ हेच साकडं मी विठ्ठल-रुक्मिणीकडे घातलं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात म्हणाले. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असून कोणतंही चुकीचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
२. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारने जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे जमीन व्यवहारांमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे रोख व्यवहार झाल्यास त्याची माहिती थेट आयकर विभागाला पाठवली जाणार आहे. त्यानुसार आता दस्त नोंदणी करतानाच रोख रक्कम आणि चेकद्वारे करण्यात आलेल्या रकमेची स्वतंत्र नोंद केली जाणार आहे. त्यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात किती रक्कम रोख स्वरूपात आणि किती रक्कम चेकद्वारे देण्यात आली, याची माहिती उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, एखाद्या जमीन व्यवहारात एकापेक्षा अधिक खरेदीदार किंवा विक्रेते असल्यास प्रत्येक व्यक्तीच्या व्यवहाराचा स्वतंत्र हिशोब संकलित केला जाणार आहे. यामुळे प्रत्येक खरेदीदार आणि विक्रेत्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र माहिती आयकर विभागाला मिळणार आहे.
३. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! भांडुप-कांजूरमार्गदरम्यान रेल्वे रुळात बिघाड
मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा आज खोळंबा झाला आहे. भांडुप आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गिकेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चौथ्या आणि सहाव्या मार्गिकेवरील रेल्वे गाड्या जवळपास पाऊण तास एकाच ठिकाणी उभ्या होत्या. तर सहाव्या मार्गिकेवरील भुवनेश्वर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस एक तासाहून अधिक काळ रखडली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून, काही प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत जाण्याचा निर्णय घेतला.
४. महाराष्ट्रात गारठा वाढला! अनेक भागात पार १० अंशांच्या खाली
मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या घसरला. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव येथे नोंदवले गेले. तिथे ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे, निफाड आणि जळगाव या भागांमध्ये तापमानात मोठी घट झाली असून, पहाटेच्या वेळी थंडी अधिक जाणवत आहे. काही ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे. हवामानातील या बदलामागे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अक्वान’ चक्रीवादळाचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. या हवामान प्रणालीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान खाली आले आहे.
5. हेल्थ सप्लिमेंट्स आणि प्रोटीन पावडरवर आता तुकाराम मुंडेंची नजर
सध्या तरुण वर्गात बॉडीबिल्डिंगची क्रेझ अधिक वाढल्याने प्रोटीन पावडर आणि हेल्थ सप्लिमेंट्सचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतलेल्या या उत्पादनांमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात हेल्थ सप्लिमेंट्स, न्यूट्रास्युटिकल्स आणि विशेष आहाराबाबत कडक नियमावली लागू केल्याची घोषणा केली आहे.हेल्थ सप्लिमेंट्स हे केवळ दैनंदिन आहाराला पूरक असतात, त्यातून कोणताही आजार बरा होत नाही, असे एफडीएने स्पष्ट केले आहे. तसेच, प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक किंवा इतर विशेष घटकांच्या उत्पादनासाठी आणि वापरासाठी एफडीएची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच आता तुकाराम मुंढे यांनी बनावट उत्पादने विकणाऱ्यांना आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
6. पशुधन वाहतुकीवरील बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करा; शेतकरी संघटना आक्रमक
अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून विदर्भ शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे…. तर शेतातील कपाशीचे अवशेष मेंढपाळांना जनावरांच्या चाऱ्यासाठी विकण्याची मुभा द्यावी, तसेच आंतरराज्य आणि आंतरजिल्हा पशुधन वाहतुकीवरील बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा,अशी मागणी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे… तेल्हारा आणि अकोट परिसरातल्या शेतकरी आणि मेंढपाळांच्या आर्थिक हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा,अशी मागणीही करण्यात आली आहे…!
7. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत कुरघोड्यांवर शिवेंद्रराजेंचा निशाणा
नाव न घेता मंत्री जयकुमार गोरेंवर टीका
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये समन्वय राहिला नसल्याचे चित्र स्पष्ट झाले असून यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीबाबत वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सर्व सूचना आणि सुचवलेली नावे आपण वेळेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत पोहोचवली होती मात्र वरिष्ठांशी चर्चा होऊनही ‘आमचा निर्णय आता झाला आहे’ असे सांगत शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन परस्पर वेगळा निर्णय घेतला, अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली. तसेच निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांवर पक्षांतर्गत कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झाले आणि त्याचा काहीसा फटका मतदानातून बसला असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता मंत्री शिवेंद्रराजे यांनी लगावला आहे.
8.भरत गोगावलेंची थेट शरद पवारांच्या आमदाराला मंत्रीपदीची ऑफर
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी शरद पवार पक्षातील आमदाराला थेट मंत्रीपदाची ऑफर दिली आहे. गोगावले यांनी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेत येण्याबरोबर मंत्रीपदाचंही आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अभिजीत पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत. सध्या ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. जेव्हा आपण संकटात असतो त्यावेळी देव उभा राहतो, पण ज्यावेळी देव अडचणीत आला त्यावेळी अभिजीत पाटील यांचे वंशज उभे राहिल्याचे मत मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केले. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. जर आमच्याकडे येण झालं तर मंत्रीपदही देऊ शकतो, असे गोगावले म्हणाले.
9. शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
एक इंचही जमीन देणार नाही, सरपंच रणजीत पाटील यांचा इशारा
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील माऊली गावातून महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने मोजणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माऊलीपासून भाग्यनगर, नेवरीपर्यंतच्या सर्व गावांतील शेतकऱ्यांनी एकजुटीने या मोजणीला विरोध केला. कोणत्याही शेतकऱ्याने प्रशासनाला मोजणीसाठी सहकार्य केले नाही. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत ही मोजणी हाणून पाडली. विशेष म्हणजे, केवळ पुरुष शेतकरीच नव्हे, तर महिला आणि लहान मुलांसह मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांचा विरोध अत्यंत आक्रमक आणि ठाम होता.
10. इंदू मिल स्मारकाच्या कामाला विलंब, वाढीव खर्चावरून काँग्रेस आक्रमक; राज्य सरकारवर टीकेची झोड
मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाला पुन्हा विलंब होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. त्यातच स्मारकासाठी वाढीव खर्चाची गरज भासल्याने काँग्रेसने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्मारक पूर्ण करण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्ष कामाला विलंब होत असल्याने सरकार केवळ आश्वासने देत असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. निवडणुका जवळ आल्या की घोषणा आणि भूमिपूजन केले जाते, मात्र बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देताना सरकारकडून चालढकल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, दादर रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकाच्या नामकरणाच्या चर्चेपेक्षा बाबासाहेबांचे स्मारक वेळेत पूर्ण करण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
११. काँग्रेसचा भाजपाला झटका! राजस्थानच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठा विजय
राजस्थानच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. या विजयानंतर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी राज्यातील ग्रामीण भागातील जनतेचे आभार मानले आहेत. राहुल गांधी यांनी एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे, त्या पोस्टमध्ये त्यांनी पंचायत निवडणुकीत लोकांनी काँग्रेसवर विश्वास दाखवल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. मतदारांनी हे उत्तर भाजपला त्यांचं सरकार असलेल्या राज्यातून दिलं आहे आणि हे डबल इंजिन सरकारसाठी देखील आहे, असं राहुल गांधी म्हणाले. भाजपने मनरेगावर हल्ला केला, शेतकऱ्यांना तोट्यांमध्ये घालवलं, पंचायतींचे अधिकार हिसकावून घेतले. महागाई, बेरोजगारी आणि स्थलांतरामुळं गाव ओसाड केली आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
१२. पाकच्या मंत्र्यांनी दिल्लीत येताच भारतालाच दिला सल्ला…
पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री डॉ. मुसादिक मलिक नवी दिल्लीमध्ये शांघाई सहकारी संघटनेच्या परिषदेत सहभागी झालेआहेत. मे २०२३ नंतर एका पाकिस्तानी मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. असे असूनही पाकिस्तानच्या या मंत्र्यांनी भारतालाच सल्ला दिला आहे. “मला आशा आहे की तुम्हाला पुन्हा तक्रारीची संधी मिळणार नाही. आम्ही भारतात येत राहू. भारतातील या परिषदेत सहभागी होता आले. जेव्हा वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी एकत्र बसतात, तेव्हा त्यांना एकमेकांचे ऐकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते. यामुळे परस्पर सामंजस्य वाढते आणि प्रदेशातील परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते,”असे मलिक यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मात्र सूचक मौन बाळगले.
१३. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ आणि भारतीय बँकांतील कमी व्याजदरांचं कौतुक केलं आहे. तर अमेरिकेतील उच्च व्याजदरांवरून अमेरिकी मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’वर जोरदार टीका केली आहे. “जगात सर्वात कमी व्याजदर अमेरिकेत असायला हवे. जर अमेरिकेने व्याजदर कमी केले, तर देशाचा जीडीपी कितीतरी पटीने वाढेल. भारताकडे पहा. तिथे व्याजदर कमी आहेत आणि त्यांचा जीडीपी ७ टक्के आहे आणि आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर आपला जीडीपी १४, १५ किंवा कदाचित २० टक्क्यांपर्यंतही पोहोचू शकतो. आपण इतकी चांगली कामगिरी करतो आणि त्यानंतर हे फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवतात. ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे”, असं म्हणत ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हला सुनावलं आहे.
१४. भारतासोबतचा अंतिम सामना रद्द झाला तरीही, पाकिस्तानला ट्रॉफी
मेन्स ब्लाइंड क्रिकेट आशिया कप 2026 भारत आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी होणारा स्पर्धेचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेकही होऊ शकली नाही. हा सामना बांगलादेशची राजधानी ढाका येथे खेळवण्यात येणार होता. मात्र, सामना न खेळताच पाकिस्तानच्या संघाला विजेता घोषित करण्यात आल्याने भारतीय संघाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाने ट्रॉफी वितरण समारंभावरही बहिष्कार टाकला.पाकिस्तानला नेट रनरेटच्या आधारावर विजेता घोषित करण्याच्या निर्णयावर भारतीय संघाने आक्षेप घेतला आहे. पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यानंतर नेट रनरेटच्या आधारे विजेता ठरवण्याचा नियम लागू होत नसल्याचे भारतीय संघाचे म्हणणे आहे.
१५. शरद कपूरच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
अभिनेता शरद कपूरच्या प्रकृतीबाबत प्राणी हक्क कार्यकर्त्या आणि अभिनेत्याची जवळची मैत्रीण हेमा चौधरी यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. हेमा यांच्या म्हणण्यानुसार, उपचारांची प्रक्रिया सुरू झाली असून, डॉक्टरांनी त्यांना सध्या पूर्णपणे विश्रांती घेण्याची सूचना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याला भेटण्यासाठी आणि त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी, सेलिब्रिटी मंडळी तसंच त्याचे चाहते प्रयत्न करत आहेत. मात्र, अचानक वाढलेल्या या संपर्कामुळे शरद काहीसा अस्वस्थ झाला आहे. सतत येणारे फोन आणि संभाषणांचा त्याच्यावर ताण येत आहे. मात्र सध्या तेव्यवस्थित जेवत असून त्याची मानसिक स्थिती देखील उत्तम आहे. विशेष म्हणजे, सोनू निगम यांचा व्हॉईस मेसेज ऐकून शरदला विशेष आनंद झाला. दरम्यान, चाहत्यांच्या प्रार्थना आणि सदिच्छांमुळे अभिनेत्याला प्रोत्साहन मिळत असल्याचेही हेमा यांनी सांगितले.
हेही वाचा:









