नवी दिल्ली : कर्नाटकमधील कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना मंगळवारी 14 दिवसांची म्हणजे 1 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिवकुमार यांना प्रथम तपासणीसाठी रुग्णालयात न्यावे. त्यांची प्रकृती स्थिर असेल तर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात केली जावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कॉंग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या शिवकुमार यांना मनी लॉण्डरिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 3 सप्टेंबरला अटक केली. ईडी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. वैद्यकीय कारणास्तव शिवकुमार यांना जामीन मंजूर करण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली. त्यांच्या जामीन अर्जावर उद्या (गुरूवार) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ईडीने शिवकुमार यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला. शिवकुमार यांच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली जावी, अशी मागणी ईडीच्या वतीने करण्यात आली. कर्नाटकचे माजी मंत्री असणारे शिवकुमार सध्या आमदार आहेत. ते विधानसभेवर तब्बल सातवेळा निवडून गेले आहेत.