Hardik Pandya : हार्दिक पंड्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणार? IPL मध्ये सर्वात मोठा ट्वीस्ट
आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी क्रिकेट जगतात एका मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्सने २०२४ च्या हंगामात हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) संघात घेऊन थेट रोहित शर्माच्या जागी कर्णधारपदाची धुरा सोपवली होती.

Hardik Pandya : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी क्रिकेट जगतात एका मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्सने २०२४ च्या हंगामात हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) संघात घेऊन थेट रोहित शर्माच्या जागी कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. मात्र, कर्णधार म्हणून हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला अपेक्षित यश मिळवता आले नाही आणि चाहत्यांमध्येही मोठी नाराजी पाहायला मिळाली.
याच पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आगामी हंगामात मुंबई इंडियन्सची साथ सोडून दुसऱ्या संघाकडून खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला त्याचे नाव राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांसारख्या बलाढ्य संघांशी जोडले गेले होते.
परंतु आता पंजाब किंग्सने यात बाजी मारल्याचे दिसत असून रिकी पाँटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा पंजाबचा संघ हार्दिकसारख्या स्टार अष्टपैलूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आहे.
स्पोर्ट्सस्टारच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील ही ट्रेड डील सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विशेष म्हणजे हा व्यवहार पैशांच्या (कॅश डील) बदल्यात न होता खेळाडूंच्या अदलाबदलीतून होणार असल्याचे समजते. हार्दिकच्या बदल्यात मुंबई इंडियन्सने पंजाबकडून एकाऐवजी दोन महत्त्वाच्या खेळाडूंची मागणी केली आहे.
यात भारताचा आघाडीचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज विष्णू विनोद यांचा समावेश आहे. विष्णू विनोद याआधीही मुंबईच्या ताफ्यात राहिल्याने त्याला संघाच्या वातावरणाचा चांगला अंदाज आहे. तर दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या साथीला अर्शदीप सिंग आल्यास मुंबईची सुरुवातीच्या आणि डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी अधिक घातक ठरेल, असा मुंबईचा होरा आहे.
आयपीएलच्या सर्व संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या आठवड्याच्या अखेरीस या बहुचर्चित ट्रेडवर अधिकृत शिक्कामोर्तब (Hardik Pandya) होण्याची शक्यता आहे.






