वाई – फक्त सभासदांच्या आग्रहाखातर प्रचंड अडचणीत असणारा किसनवीर कारखाना ताब्यात घेऊन,त्यावेळी खिशामध्ये एक रुपया नसताना फक्त शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून एफ आर पी पेक्षा जास्त दर आम्ही दिला. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळावेत म्हणून मिळणाऱ्या मंत्रिपदाचा त्याग करून शेतकऱ्यांसाठी ४६७ कोटी देण्याच्या अटीवर महा आघाडीत सहभागी झालो असे प्रतिपादन वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे आमदार मकरंद आबा पाटील यांनी केले. जांब ता. वाई याठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करताना आ. मकरंद पाटील बोलत होते. याप्रसंगी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन प्रमोद दादा शिंदे, सरपंच अभिजित शिंदे, जांब विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय शिंदे, व्हा.चेअरमन रियाज इनामदार, उपसरपंच विद्याश्री शिंदे, सुजाता शिंदे, दादासाहेब शिंदे, शंकरराव शिंदे, अरुण अडकरी, दत्तात्रय गायकवाड, माजी सरपंच हणमंत शिंदे उपस्थित होते. आ.मकरंद पाटील म्हणाले, मी नेहमीच वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कोविड काळात हजारो रुग्ण आणि सर्वसामान्य माणसांना आधार दिला. अतिवृष्टी काळात महाबळेश्वर गावातील ८५ गावांचा संपर्क तुटला होता. त्याच तालुक्यात तब्बल ४०० पूल बांधले. वाई तालुक्यात करोडो रुपयांची विकासकामे केली. प्रत्त्येक गावात पाणीपुरवठ्याची योजना चालू केल्या. हातामध्ये एक रुपया नसताना दोन्ही सीजन मध्ये एफआरपी पेक्षा जास्त रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली.ज्या कारखान्याची जप्ती होणार होती. अडचणीत आलेला कारखाना सभासदांच्या आग्रहाखातर ताब्यात घेतला. त्याच किसनवीर कारखान्यासाठी सरकारकडून ४६७ कोटी रुपये आणून शेतकऱ्यांची मागील सर्व देणी दिली. महायुतीच्या माध्यमातून वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला, असे आ. पाटील म्हणाले. प्रमोद शिंदे म्हणाले, फक्त मकरंद आबा आणि नितीन काकांच्या कार्यकुशलते मुळेच प्रचंड अडचणीत असणारे प्रतापगड आणि किसनवीर कारखाने सक्षमपणे चालवून शेतकऱ्यांची सगळी देणी देण्यात आली. जे मागील उसाचे पैसे बुडले असते ते सर्व पैसे आ. मकरंद पाटील यांचेमुळे शेतकऱ्यांना मिळाले. मकरंद आबांनी गट पक्ष न बघता तिन्ही तालुक्यातील त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविले. म्हणूनच मकरंद आबांना पुन्हा आमदार बनवूया.