वॉशिंग्टन : ऍपलच्या विविध उत्पादनांच्या विक्रीमध्ये 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये घट झाल्याने कंपनीचे प्रमुख टीम कुक यांच्या वेतनातही कपात करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. टीम कूक यांना वार्षिक एक कोटी 16 लाख डॉलर एवढेच वेतन मिळाले. 2018 मध्ये त्यांना वार्षिक एक कोटी 57 लाख डॉलर एवढे उत्पन्न मिळाले होते. टीम कुक यांना 30 लाख डॉलर इतके मूळ वेतन दिले जाते. त्यावर इतर भत्ते आणि बोनस यांचा समावेश असतो. कंपनीच्या परफॉर्मन्सवर इतर भत्ते आणि बोनस अवलंबून असतो.
ऍपलच्या विविध उत्पादनांची विक्री त्या वर्षात कशी झाली, यावर कंपनीकडून दिले जाणारे विविध भत्ते आणि बोनस अवलंबून असतात. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये कंपनीच्या उत्पादनांची विक्री अपेक्षित न झाल्याने त्यांच्या एकूण वेतनात कपात झाली आहे. 2019 मध्ये टीम कुक यांना 77 लाख डॉलर इतक्या रकमेचे भत्ते आणि बोनस देण्यात आले. 2018 मध्ये टीम कुक यांना एक कोटी 20 लाख डॉलर इतक्या रकमेचे भत्ते आणि बोनस मिळाले होते. त्यामुळेच 2019 मध्ये त्यांच्या एकूण वेतनात इतका मोठा फरक पडला आहे.
टीम कुक यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या खासगी विमानावर 2019 मध्ये कंपनीकडून 885000 डॉलर खर्च करण्यात आले आहेत. टीम कुक यांच्या खासगी आणि कंपनीशीसंबंधित सर्व प्रकारच्या प्रवासासाठी त्यांना खासगी विमान दिले जाते.
ऍपल आयफोनच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षात घट झाल्याने आता कंपनी इतर माध्यमातून आपला महसूल वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. डिजिटल मजकूर इतर सेवांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जातो आहे.