PM Modi Calls Balen Shah : नेपाळमध्ये महापूर.! पंतप्रधान मोदींचा बालेन शाह यांना फोन, ट्वीट आले चर्चेत !
मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला असून, संकटाच्या या काळात भारत नेपाळच्या जनतेसोबत ठामपणे उभा असल्याचे सांगितले.

PM Modi Calls Balen Shah : नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुराने हाहाकार माजवला आहे. तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेकडो नागरिक आणि पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक माहितीनुसार, एकूण 384 प्रवासी बेपत्ता आहेत. यामध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. बेपत्ता परदेशी नागरिकांमध्ये 105 भारतीय पर्यटक आणि 37 अनिवासी भारतीय (NRI) आहेत.
या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला असून, संकटाच्या या काळात भारत नेपाळच्या जनतेसोबत ठामपणे उभा असल्याचे सांगितले.
भारताकडून शक्य ती सर्व मानवतावादी मदत आणि बचावकार्य करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांच्या पथकांमध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी समन्वय सुरू असल्याचे मोदी यांनी सांगितले.
Spoke to Prime Minister Balendra Shah and conveyed condolences on the loss of lives due to the floods in Nepal. The people of India stand in solidarity with their sisters and brothers in Nepal at this difficult time.
India is ready to provide all possible humanitarian…
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2026
पुराच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय दूतावासही सक्रिय झाला आहे. बेपत्ता किंवा अडचणीत असलेल्या भारतीय नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी दूतावासाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
दरम्यान, बेपत्ता प्रवाशांची यादी अद्याप प्राथमिक असून ट्रॅव्हल एजन्सी, स्थानिक प्रशासन, मार्गदर्शक आणि सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्या स्थितीची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे.
बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि आसपासच्या भागात मोठी हानी झाली.
पुराच्या पाण्यामुळे वाहने, पूल, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून किमान डझनभर जलविद्युत प्रकल्पांवरही त्याचा परिणाम झाला आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून खराब हवामान आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे बचाव पथकांसमोर मोठी आव्हाने आहेत.
दरम्यान, नेपाळमधील पूरस्थितीचा परिणाम भारतातील सीमावर्ती भागांवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नदीकाठच्या भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या आपत्तीमुळे कैलास मानसरोवर यात्रेच्या मार्गावरही मोठा परिणाम झाला आहे. बेपत्ता भारतीयांपैकी अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून भारतीय यंत्रणांकडून त्यांचा शोध आणि मदतकार्याला प्राधान्य दिले जात आहे.




