US Iran War Live Updates : अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तराचा इराणचा इशारा
येमेनच्या पश्चिमेकडील भागात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात किमान ६ जण ठार आणि १८ जखमी झाल्याचे हौथींच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

US Iran War Live Updates – इराणशी संबंधित कोणत्याही ठिकाणांवर अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांना रिव्होल्युशनरी गार्डकडून प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघेई यांनी म्हटले आहे.
इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची हाताळणी करणाऱ्या रिव्होल्युशनरी गार्डच्या हवाई दलाचे कमांडर जनरल मजिद मोसावी हे योग्यवेळी आणि निश्चित लक्ष्यावर कारवाई करतील. तेंव्हाच अमेरिकेला इराणच्या ठिकाणांवर हल्ल्याचा परिणाम लक्षात येईल, असे बाघेई म्हणाले.
अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना इराण कशाप्रकारे प्रत्युत्तर देऊ शकेल, याबाबत व्हाइट हाउसकडून पेंटॅगॉन आणि लष्कराकडून मूल्यांकनाच्या आधारे अंदाज वर्तवण्याची विनंती केली आहे. या वृत्तावर प्रतिक्रिया विचारली असता बाघेई यांनी हा इशारा दिला.
इराणच्या अणू कार्यक्रमावरून कतारने जर्मनीत संयुक्त निवेदनात केलेल्या टीकेवरून इराणने नाराजी व्यक्त केली आहे. अणू कार्यक्रम, प्रादेशिक सुरक्षा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीबाबत कतारने जर्मनीबरोबर दिलेल्या संयुक्त निवेदनात टीका केली होती.
कतारने जर्मनीबरोबर मिळून केलेले हे निवेदन आश्चर्य वाटावे असे आणि खेदजनक आहे. याबाबत कतारने स्पष्टिकरण देणे गरजेचे असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघेई यांनी म्हटले आहे.
इराणने या संदर्भात कतारच्या प्रभारी अधिकाऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात येण्याचे समन्स बजावले आहे. अमेरिका आणि इराणमध्ये समजोता घडवून आणण्याच्या प्रयत्नात कतार आहे.
सौदीच्या हल्ल्यात ६ ठार
येमेनच्या पश्चिमेकडील भागात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात किमान ६ जण ठार आणि १८ जखमी झाल्याचे हौथींच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
सौदीच्या सैन्याने येमेनमधील होदेदा प्रांतातील टेलिकम्युनिकेशन सेंटर आणि रहिवासी इमारतीवर मारा केल्याचे हौथींचे आरोग्य मंत्री अनीस-अल- असबाही यांनी म्हटले आहे. या हल्ल्याबाबत सौदीकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही.






