Shani Shingnapur : पुजेचे साहित्य घ्याच! शनीशिंगणापूरमध्ये भाविकांची वाट अडवणाऱ्या तरुणावर गुन्हा
Shani Shingnapur : शनिशिंगणापूर मंदिर परिसरात भाविकांना बळजबरीने पूजेचे साहित्य देऊन पैसे उकळण्याचा प्रकार उघड; सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

Shani Shingnapur – शनीशिंगणापूर येथील मंदिर परिसरात भाविकांची अडवणूक करून जबरदस्तीने पुजेचे साहित्य विकत घेण्यास भाग पाडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनीशिंगणापूर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनैश्वर देवस्थानाचे सुरक्षा अधिकारी संभाजी भाऊसाहेब बोरुडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार रोहित सुभाष घोत्रे (वय 24, रा. हलवाई गल्ली, सोनई, ता. नेवासा) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दि.16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरातील बर्फी काउंटरजवळ ही घटना घडली. आरोपीने भाविकांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण करत त्यांच्या हातात जबरदस्तीने शनिदेवाच्या पूजेचे धागे-दोरे व इतर साहित्य देऊन पैसे घेण्याचा प्रयत्न केला.
भाविकांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 126(2) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल ए.बी. शिंदे या करत आहेत.



