Nevasa : ऊसाला साडेचार हजारांची पहिली उचल मिळवणार; नेवाशात शेतकरी संघटनेने अडवला साखरेचा ट्रक
Nevasa : ऊसाला प्रतिटन साडेचार हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी नेवासा तालुका शेतकरी संघटनेने भेंडा येथील साखर कारखान्याचा ट्रक अडवला.

Nevasa : ऊसाला प्रतिटन साडेचार हजार रुपये पहिली उचल मिळावी आणि रास्त भावासाठी महसूल वाटप सूत्र लागू करावे, या मागणीसाठी नेवासा तालुका शेतकरी संघटनेने भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा साखरेचा ट्रक अडवला. तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे आणि युवा अध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजितदादा काळे यांच्या सूचनेनुसार राज्यभर साखरेची वाहतूक रोखण्याचे आंदोलन सुरू असल्याचे संघटनेने सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रतिटन ३१०० रुपये दिले जात असल्याचा आरोप करत संघटनेने नाराजी व्यक्त केली. साखरेची विक्री प्रतिकिलो ६० रुपयांपेक्षा कमी दराने करू नये, अशीही मागणी करण्यात आली.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, उसापासून साखर, मळी, बगॅस आणि इथेनॉल यांसारखी उत्पादने तयार होतात. त्यामुळे या सर्व उत्पादनांच्या उत्पन्नाचा योग्य वाटा शेतकऱ्यांना मिळावा. सी. रंगराजन समितीने ७०:३० महसूल वाटप सूत्र सुचवले होते. त्यानुसार उत्पन्नातील ७० टक्के वाटा शेतकऱ्यांना देण्याची मागणी आहे.
आंदोलकांनी कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, व्यवस्थापकीय संचालक अनिल शेवाळे आणि संचालक अशोकराव मिसाळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अडवलेला ट्रक माघारी पाठवण्यात आला. साखरेची किमान विक्री किंमत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन कारखाना व्यवस्थापनाने दिले.





