Suvendu Adhikari : भय संपले, आता विश्वासाचे पर्व..! मूळ गावी सुवेंदू अधिकारी यांचे जल्लोषात स्वागत
पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रविवारी राज्याच्या राजकारणात एका नवीन युगाची घोषणा केली.

Suvendu Adhikari – पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रविवारी राज्याच्या राजकारणात एका नवीन युगाची घोषणा केली. राज्यातील भीतीचे वातावरण आता संपले असून, त्याची जागा विश्वासाने घेतली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या मूळ गावी, कांथी येथे समर्थकांनी केलेल्या जंगी स्वागतानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बंगालमध्ये प्रगतीचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करताना अधिकारी म्हणाले, पंतप्रधानांनी बंगालच्या जनतेला आश्वासन दिले आहे. आता प्रत्येक घटकाच्या सहभागातून आशा आणि विश्वासाच्या वातावरणात बंगालची प्रगती होईल.
शनिवारी ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी पार पडल्यानंतर आणि कालीघाट मंदिरात दर्शन घेतल्यावर अधिकारी रात्री उशिरा कांथी येथील आपल्या शांतीकुंज या निवासस्थानी पोहोचले. पहाटे २ वाजता सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी हजारो समर्थकांनी गर्दी केली होती.
फुलांच्या वर्षावात आणि घोषणाबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भावूक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी गाडीतून उतरून लोकांशी संवाद साधला आणि त्यांना घरी जाण्याची विनंती केली.
आपल्या घरी पोहोचल्यावर त्यांनी वडील शिशिर अधिकारी आणि आई गायत्री अधिकारी यांचे आशीर्वाद घेतले. स्थानिकांनी त्यांचे वर्णन जिद्दी आणि दृढनिश्चयी नेता असे केले आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर कोणतीही मोठी बॅरिकेडिंग (अडथळे) न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून सामान्य जनतेला त्रास होणार नाही. नंदकुमार आणि डायमंड हार्बर यांसारख्या लांबच्या ठिकाणांहून लोक अधिकारी यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
दादा आता मुख्यमंत्री झाले आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या विजयामुळे आम्हाला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशा भावना समर्थकांनी व्यक्त केल्या..





