नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोमवारी देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्या भेटींमुळे उत्तरप्रदेशात लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याच्या चर्चांचा जोर वाढला. उत्तरप्रदेशात वर्ष २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी आता वर्षभराचाच अवधी उरला आहे. त्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी सत्ताधारी भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे. त्यातून राज्य मंत्रिमंडळाच्या आघाडीवर फेरबदल, विस्ताराचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता काही काळापासून वर्तवली जात आहे. फारशी समाधानकारक कामगिरी नसणाऱ्या काही मंत्र्यांना डच्चू दिला जाईल. तर काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल, विस्तारातून सामाजिक आणि विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्नही भाजप करू शकतो. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाची उत्तरप्रदेशात पीछेहाट झाली. त्यामुळे पुढील वर्षीच्या राजकीय रणसंग्रामाला सामोरे जाण्यासाठी पक्षाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. त्यातून योगींच्या दिल्ली दौऱ्याचे आणि भेटीगाठींचे राजकीय महत्व वाढले आहे.