Narendra Modi : “आता कॉंग्रेस हा परजीवी पक्ष”; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात
कर्नाटकातील अंतर्गत सत्तासंघर्षामुळे काँग्रेसला चांगले प्रशासन देण्यात अपयश आले असून, त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.

Narendra Modi – कर्नाटकातील अंतर्गत सत्तासंघर्षामुळे काँग्रेसला चांगले प्रशासन देण्यात अपयश आले असून, त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. आज हा पक्ष एक परजीवी पक्ष अर्थात दुसऱ्यावर अवलंबून राहणारा पक्ष बनला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. तसेच देशभरात भाजपचा राजकीय प्रभाव वाढत असताना, बंगळुरूमधून एक भगवा सूर्य उगवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
बंगळुरू येथे आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या निवडणुकीतील कामगिरीवरून टोला लगाविला.
नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस फक्त खोटेपणा आणि विश्वासघाताचे राजकारण करते. काँग्रेसच्या सत्तेच्या पुस्तकात सुशासनाचा कोणताही अध्यायच नाही. देशाची जनता स्थैर्य, विकास आणि राष्ट्रनीतीच्या बाजूने उभी आहे आणि याच कारणामुळे भाजप तसेच एनडीएला सातत्याने जनसमर्थन मिळत आहे.
काँग्रेस स्वतःही खोटी आहे आणि तिच्या हमीदेखील खोट्या आहेत. कर्नाटकात गेल्या तीन वर्षांपासून जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी सरकारचा बहुतांश वेळ अंतर्गत कलहात गेला आहे. राज्यात मुख्यमंत्री किती दिवस राहतील आणि कुणाला संधी मिळेल हे देखील ठरवता येत नाही.
काँग्रेस हा परजीवी पक्ष ठरत असून ती आपल्या सहयोगी पक्षांसोबतही विश्वासघात करते. त्यांनी तमिळनाडूमधील काँग्रेस आणि एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या संबंधांचा उल्लेख करत म्हटले की, अनेक वर्षे जुनी आघाडी असूनही काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी आपल्या सहयोगी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप केला.
भाजप हे सुशासनाचे मॉडेल
आमच्यासाठी लोककल्याण सर्वोच्च असून सबका साथ, सबका विकास हा मंत्र आहे. भाजपचे मॉडेल हे सुशासनाचे मॉडेल असल्याने जनता विविध राज्यांमध्ये भाजपला दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी देत आहे, तर काँग्रेसची राज्य सरकारे पुन्हा सत्तेत येण्यात अपयशी ठरली आहेत.
गेल्या १२ वर्षांपासून केंद्रात एनडीएचे सरकार आहे आणि देशातील २१ हून अधिक राज्यांमध्ये भाजप किंवा एनडीएची सरकारे विकासाच्या मंत्रासह काम करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.






