प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – राजकीय जोडे बाजूला ठेवून तळेगाव दाभाडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांनी पूर्ण वेळ जनतेसाठी काम करावे व नागरिकांचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी केले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेत गणेश काकडे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित उपनगराध्यक्ष गणेश काकडे व स्वीकृत नगरसेवकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, स्वीकृत नगरसेवक शिवाजी आगळे, बाबा मुलाणी, सुरज सातकर, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, पक्ष प्रतोद इंद्रकुमार ओसवाल, सत्यम खांडगे, गटनेत्या हेमलता खळदे यांच्यासह सर्व नगरसेवकांचा आमदार सुनील शेळके, नगराध्यक्ष संतोष दाभाडे व उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुढे आमदार शेळके म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांचा प्रत्येक प्रभागात जाऊन अभ्यास करून ते सोडवण्यास प्राधान्य द्यावे. या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.सत्काराला उत्तर देताना उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी सांगितले की, शहरातील नागरी सुविधा सुधारण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल. तसेच नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आंध्रा धरणाच्या पाणी योजनेवर विशेष लक्ष देऊन ती कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे प्रभारी अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.