Subway Security : सुरक्षित प्रवासाचा दावा फोल? पाहा पिंपरी-चिंचवडमधील भूयारी मार्गांचे धक्कादायक वास्तव
Subway Security : सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्हेगारांचे फावले; महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

Subway Security – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेले भूयारी मार्ग सध्या सुरक्षेअभावी धोकादायक ठरत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि विनाअपघात प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने शहरात एकूण अकरा ठिकाणी भूयारी मार्ग उभारण्यात आले.
मात्र, आवश्यक सुविधा आणि देखभालीअभावी हे मार्ग भीतीचे केंद्र बनत असल्याचा आरोप होत आहे. अनेक भूयारी मार्गांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र आहे. अचानक दिवे बंद होणे, दुर्गंधी, अस्वच्छता आणि तांत्रिक बिघाड यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश भूयारी मार्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
काही मार्ग निर्जन असल्याने महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. टवाळखोरांचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, नियमित तपासणी आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील सर्व भूयारी मार्ग तातडीने सुरक्षित करावेत, अशी मागणी सामाजिक स्तरावर जोर धरू लागली आहे.





