स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोस मान्यता; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

पुणे – शहरातील स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या विस्तारास मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. त्यानुसार स्वारगेट ते कात्रज हा मेट्रोमार्ग भुयारी असणार असून या मेट्रो मार्गाची लांबी 5.46 किमी असणार असून त्यावर तीन स्टेशन असणार आहे. या प्रकल्पासाठी 3 हजार 668 कोटींचा खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली. दरम्यान, हा मेट्रो प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
शहरातील कात्रज प्रमुख उपनगर असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. या परिसरातील वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होऊन सदर परिसरातील नागरिकांना तसेच एकंदरीत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज ही भूयारी मेट्रो रेल मार्गिका निश्चितच फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात रु. 450 कोटी 95 लाख व केंद्र व राज्य शासनाचे कर, शुल्क यांवरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात रु. 440 कोटी 32 लाख असा एकूण रु. 891 कोटी 27 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. या मेट्रोसाठी पुणे महानगरपालिकेकडून रु. 450 कोटींचे अनुदान आणि भूसंपादन, पूनर्वसन व पूनर्वसाहत व बांधकाम कालावधी दरम्यानचे व्याज याकरिता रु. 204 कोटी असे एकूण रु. 655कोटी इतके वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मेट्रोमार्गासाठी केंद्र शासनाकडून 300 कोटींचे अनुदान मिळावे, यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात येणार आहे. तसेच वित्तीय संस्थेमार्फत 1 हजार 803 कोटींचे अल्प व्याज दराचे कर्ज घेण्यास, सदर कर्जाची मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांचा कोणताही भार राज्यशासनावर येणार नाही या अटीवर, महामेट्रो यांना प्राधिकृत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.





