MSEDCL TOD Scheme : दिवसा वीज वापरा आणि मिळवा कोट्यवधींची सूट! महावितरणच्या ‘या’ योजनेमुळे ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटींचा फायदा
MSEDCL TOD Scheme : सकाळी ९ ते ५ या वेळेत वीज उपकरणे वापरा आणि मिळवा १५ ते २५ टक्क्यांपर्यंत सवलत; पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांनी लाटला सर्वाधिक लाभ.

MSEDCL TOD Scheme – राज्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरणची टाइम ऑफ डे (टीओडी) सवलत योजना वरदान ठरत आहे. जुलै २०२५ पासून लागू झालेल्या या योजनेमुळे आतापर्यंत ७० लाख ग्राहकांनी तब्बल २२३५ कोटी रुपयांची बचत केली आहे. यामध्ये उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांचा मोठा वाटा आहे. विजेचा वापर कोणत्या वेळेत होतो, त्यानुसार दरात सवलत दिली जाते.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास ग्राहकांना हे विशेष फायदे मिळतात. राज्यात सौरऊर्जेची उपलब्धता वाढल्याने दिवसाची वीज स्वस्त पडत आहे. त्यामुळे महावितरणने ही सवलत लागू केली आहे. राज्यात प्रथमच घरगुती ग्राहकांना या सवलतीचा लाभ मिळत आहे. स्मार्ट मीटर असलेल्या ६९ लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांनी ८९ कोटी रुपयांची सवलत मिळवली आहे.
दिवसा वीज वापरणाऱ्यांना प्रति युनिट ८५ पैसे सवलत दिली जात आहे. त्याचा फायदा नागरिक घेत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत तब्बल ७० लाख ग्राहकांनी याचा फायदा घेतला आहे. त्या माध्यमातून २ हजार २३५ कोटी रुपयांचे वीजबिलाची नागरिकांची बचत झाली आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील लघुउद्योजकांनी देखील याचा फायदा घेतला आहे. तर मोठ्या कंपन्यांना देखील फायदा झाला आहे.
सवलतीचे गणित
औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १५ टक्के सवलत मिळते. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत ही सवलत २५ टक्क्यांपर्यंत वाढते. नागरिकांनी जास्तीत जास्त वीज उपकरणे सकाळी ९ ते ५ या वेळेत वापरून बिल कमी करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
उद्योगांना सर्वाधिक फायदा
– उच्चदाब औद्योगिक ग्राहकांनी १५३४ कोटी रुपयांची बचत केली आहे.
- लघुदाब आणि यंत्रमाग अशा एकूण ४३,९११ उद्योगांना १७७४ कोटींचा लाभ झाला आहे.
- वाणिज्यिक वापराच्या ११,०१७ ग्राहकांना २३९ कोटींची सवलत मिळाली आहे.
- सार्वजनिक पाणीपुरवठा संस्थांनाही २०२ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.






