PCMC Police : गुन्हेगारांचे ‘काऊंटडाऊन’ सुरू! शहरात आता एआय (AI) कॅमेऱ्यांचा पहारा; शासनाचा मोठा निर्णय
PCMC Police : राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडून पिंपरी-चिंचवडच्या एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाला हिरवा कंदील; तांत्रिक सुरक्षिततेत मोठी झेप.

PCMC Police – गुन्हे नियंत्रण, वाहतूक शिस्त आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड शहरात आता तंत्रज्ञानाची भक्कम ढाल उभी राहणार आहे. एआय आधारित एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास शासनाच्या उच्चस्तरीय समितीची (एचपीसी) मान्यता मिळाल्याने शहराच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी झेप अपेक्षित आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.
वेगाने विस्तारत असलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिसर, वाढती लोकसंख्या, औद्योगिक पट्टा आणि आयटी हबमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील ठरत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगवर भर देत हा शहरव्यापी प्रकल्प प्रस्तावित केला होता. या प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत आधी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे एका केंद्रीकृत प्रणालीत जोडले जाणार आहेत.
तसेच कव्हरेज नसलेल्या महत्त्वाच्या भागांत नवीन कॅमेरे बसवले जाणार असून चाकण, तळेगाव, भोसरी एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी हबमध्ये कडक निगराणी राहणार आहे.देहू–आळंदीतील धार्मिक गर्दी, सण-उत्सव व पालखी मिरवणुकांदरम्यान वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. एआय आधारित व्हिडिओ अॅनालिटिक्समुळे संशयास्पद हालचाली, नियमभंग आणि आपत्कालीन परिस्थितीवर तात्काळ प्रतिसाद शक्य होईल.
नव्या पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार असून, त्यातून शहरभरातील थेट दृश्ये संबंधित विभागांना उपलब्ध राहणार आहेत. एआयच्या सहाय्याने पिंपरी-चिंचवडची सुरक्षा व्यवस्था आता अधिक स्मार्ट, जलद आणि प्रभावी होणार आहे.
“गुन्हेगारांच्या हालचाली आणि वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. भविष्यात हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.”
– विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड




